पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात आवक सुरू झाली असून, गेल्या चोवीस तासांत ३४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३७ टक्के झाला आहे. एक जुलैपासून २१ टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसीसह काही नगरपालिका, मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. यंदा पावसाने ओढ दिल्याने धरणातील पाणीसाठा १६ टक्क्यांवर आला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने १९ जूनपासून १५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. तेव्हापासून महापालिकेकडून एक ते दीड तासाने पाण्याच्या वेळा कमी केल्या आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

पावसाने एक जुलै पासून धरण परिसरात हजेरी लावली आहे. मावळ परिसरात संततधार सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात ३४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३७ टक्के झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत ७८२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, मागील वर्षी आतापर्यंत ७४.६४ टक्के पाणीसाठा धरणात झाला होता.

शहराची लोकसंख्या ३८ लाख, दिवसाला ६५० एमएलडी पाण्याची आवश्यकता

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येला शुद्ध, सुरक्षित आणि अखंड पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पवना धरण ते सेक्टर २३, निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पवना धरणातील पाणी प्रदूषणमुक्त व विश्वासार्ह पद्धतीने थेट जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सध्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे ३८ लाख असून दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.

त्यामध्ये पवना नदीतून ५२० एमएलडी, इंद्रायणी नदीतून १०० एमएलडी आणि एमआयडीसीमार्फत ३० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्याची पाण्याची मागणी ६५५ एमएलडी असून मंजूर पाणी आरक्षण ७७६ एमएलडी आहे. लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता हे आरक्षण २०२९ पर्यंत पुरेसे राहील, असा अंदाज आहे. प्रस्तावित लोकसंख्या अंदाजानुसार २०३१ मध्ये ५५ लाख, २०४१ मध्ये ९५ लाख आणि २०५१ मध्ये १ कोटी ३५ लाख लोकसंख्या होण्याची शक्यता असून त्यानुसार अनुक्रमे ९४९ एमएलडी, १,६३८ एमएलडी आणि २,३२८ एमएलडी पाण्याची आवश्यकता भासणार आहे