पिंपरी : मावळातील पवना धरण परिसरात सोमवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पवना धरण ९९ टक्के भरले असून पवना नदीपात्रामध्ये ५ हजार ७२० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे पवना नदीला पूर आला असून दुथडी भरून वाहत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. त्यामुळे विसर्गात वाढ केली असून नदी काठच्या नागरिकांना सतकर्तेचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर, ‘एमआयडीसी’सह काही नगरपालिका, मावळ तालुक्यातील गावांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. मागील काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत असून धरणातील येवा वाढला आहे. सोमवार सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून धरणातील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर गेला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून धरणातून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली. ५ हजार ७२० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावर पाऊस पडत असून धरणामध्ये मोठा येवा प्राप्त होत आहे. पवना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याकरिता नदीपात्रामध्ये होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन एकूण विसर्ग दहा क्युसेक करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण व येवा पाहता हा विसर्ग १५ हजार क्युसेक पर्यंत टप्पा टप्प्याने वाढवला जाण्याची दाट शक्यता आहे. सततच्या होणाऱ्या पर्जन्यामुळे ओढे व नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ होऊ शकते. नदीच्या सखल भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पवना नदी खोऱ्यातील सर्व नागरिकांनी नदीपात्रातील आपले साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप तथा जनावरे नदीपात्रापासून सुरक्षित ठिकाणी इतरत्र हलवण्यात यावीत, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.
१५ टक्के पाणीकपात कायम
पवना धरणातील पाणीसाठा ९४.९८ टक्के झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात १९ जूनपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात रद्द हाेण्याची अपेक्षा शहरवासीयांना हाेती. मात्र, ऑक्टोबरपर्यंत धरणात शंभर टक्के पाणीसाठा असेल तरच १५ टक्के पाणी कपात रद्द केली जाईल. अन्यथा ही पाणी कपात पुढे कायम राहील, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
सव्वा सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने २५ नाेव्हेंबर २०१९ पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. ताे साडेसहा वर्षांनंतरही कायम आहे. अनियमित, अपुरे आणि कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. भामा आसखेडचे पाणी येईपर्यंत एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये; तसेच घाटमाथ्यावर पाऊस सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
