शहरात पुन्हा पे अॅन्ड पार्क

पहिल्या तासासाठी पाच रुपये व दुसऱ्या तासापासून दहा तासांपर्यंत पंधरा रुपये म्हणजे दोन तास वाहन उभे केले तरी तरी वीस रुपये एवढे शुल्क मोजावे लागणार आहे.

शहरात सातत्याने वादग्रस्त ठरलेली आणि सध्या बंद करण्यात आलेली पे अॅन्ड पार्क योजना पुन्हा सुरू होत असून सात महत्त्वाचे रस्ते आणि अनेक उपरस्त्यांवर चारचाकी वाहनांसाठी ही योजना पुन्हा सुरू केली जाणार आहे. पे अॅन्ड पार्कसाठी चारचाकी वाहनचालकांना भरपूर पैसे मोजावे लागणार असून पहिल्या तासासाठी पाच रुपये व दुसऱ्या तासापासून दहा तासांपर्यंत पंधरा रुपये म्हणजे दोन तास वाहन उभे केले तरी तरी वीस रुपये एवढे शुल्क मोजावे लागणार आहे.
शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी तसेच चारचाकी वाहनांना काही रस्त्यांवर सशुल्क तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली जात असून त्यासाठीचे रस्ते वाहतूक पोलिसांनी महापालिकेला निश्चित करून दिले आहेत. महापालिकेच्या स्थायी समितीपुढे शहरात पे अॅन्ड पार्क योजना सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो मंजूर करण्यात आला असून यापूर्वीच्या योजनेतील दर आणि मंजूर झालेल्या प्रस्तावातील दर पाहता चारचाकी वाहनचालकांना मोठा भरुदड पडेल अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. वाहतूक पोलिसांनी व महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जे रस्ते या योजनेत निवडले आहेत त्या रस्त्यांवरील साठ टक्के जागा वाहनांनी व्यापलेली असते. तसेच या रस्त्यांच्या जोडरस्त्यांवरही मोठय़ा प्रमाणात वाहने लावली जात असल्याचे एका पाहणीत दिसून आले आहे. या रस्त्यांवर लावल्या जाणाऱ्या वाहनांपैकी चाळीस टक्के वाहने एका तासापर्यंत  लावली जातात, तर साठ टक्के वाहने एका तासापेक्षा अधिक काळ लावली जातात.
असा असेल पार्किंगचा दर
पहिल्या तासासाठी पाच रुपये दर आकारला जाईल
त्यानंतरच्या दुसऱ्या तासापासून ते दहा तासांसाठी रुपये पंधरा

पे अॅन्ड पार्क योजनेसाठी निश्चित करण्यात आलेले रस्ते
– जंगली महाराज रस्ता
– फग्र्युसन रस्ता
– गाडगीळ रस्ता, नागनाथ पार ते श्री मिसळ ते उंबऱ्या गणपती चौक रस्ता व कुमठेकर रस्ता
टिळक चौक (अलका चित्रपटगृह) ते बाजीराव रस्त्यापर्यंतचा कुमठेकर रस्ता
– सोहराब हॉल ते पंचशील चौक ते मोबोज हॉटेल, रुबी हॉल ते कपिला हॉटेल चौक ते कोलते पाटील बिल्डिंग ते बोटक्लब रोड ते करकरे चौकापर्यंतचा रस्ता
– येरवडा पूल ते हॉटेल ब्ल्यू डायमंड चौक ते साधू वासवानी पूल ते कोरेगाव पार्क गल्ली क्रमांक ५, ६, ७, ८
– लाल महाल चौक ते महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौक ते भाऊ रंगारी पथ तसेच शनिवार पेठेच्या परिसरातील छोटे रस्ते
– कल्याणीनगर गोल्ड अॅडलॅब्ज ते सायबेज, गोल्ड अॅडलॅब्ज ते बिशप स्कूल ते कल्याणी बंगला, गोल्ड अॅडलॅब्ज ते एचएसबीसी बँक ते देसाई चौक ते शास्त्रीनगर चौक
– नवीन विधान भवन ते हॉटेल ब्ल्यू नाईल चौक (पूर्व बाजू), ब्ल्यू नाईल चौक ते किराड चौक ते सर फिरोजशहा मेहता चौक, ते बौद्ध धर्मगुरू महास्थवीर चंद्रमणी चौक ते साधू वासवानी चौक.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pay and park pmc four wheeler

ताज्या बातम्या