शहरातील अनेक रस्त्यांवर रविवारपासून पे अ‍ॅन्ड पार्क

शहरातील अनेक रस्त्यांवर रविवार (१ नोव्हेंबर) पासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येत असून…

शहरातील अनेक रस्त्यांवर रविवार (१ नोव्हेंबर) पासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येत असून पहिल्या तासाकरिता पाच रुपये आणि पुढील दहा तासांसाठी पंधरा रुपये असा दर चार चाकी वाहनांसाठी आकारण्यात येणार आहे. शुल्क वसुलीचे काम ठेकेदारांना देण्यात आले आहे.
लाल महाल चौक ते महर्षी अण्णासाहेब पटवर्धन चौक, भाऊ रंगारी पथ ते राजमाचीकर गिरणी ते नू.म.वि. मराठी शाळा ते नीलम दुकान या दरम्यान चारचाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येत आहे. त्या बरोबरच कल्याणीनगर गोल्ड अ‍ॅडलॅब्ज ते सायबेज, गोल्ड अ‍ॅल्डलॅब्ज ते बिशप्स स्कूल ते कल्याणी बंगला, गोल्ड अ‍ॅडलॅब्ज ते एचएसबीसी बँक ते देसाई चौक, शास्त्रीनगर चौक येथेही चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येत आहे.
नवीन विधान भवन चौक ते हॉटेल ब्ल्यू नाईल चौक (पूर्व बाजू) ते किराड चौक, सर फिरोजशहा मेहता चौक ते बौद्ध गुरु चंद्रमणी चौक तसेच चंद्रमणी चौक ते साधू वासवानी चौक या रस्त्यांवरही चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना लागू केली जाणार असल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी शुल्क वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. पहिल्या तासासाठी पाच रुपये व त्यानंतर दहा तासांपर्यंत पंधरा रुपये असा दर पे अ‍ॅन्ड पार्कसाठी आकारला जाणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pay and park two wheeler four wheeler

ताज्या बातम्या