पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश भागात रस्त्यांवरील पालिकेचे विद्युत दिवे बंद असल्याच्या तक्रारी स्थायी समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी केल्या. सातत्याने होणाऱ्या या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बैठकीतच खडसावले. यापुढे अशा तक्रारी आल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. उड्डाणपुलाखाली वाहने लावताना यापुढे शुल्कआकारणी होणार असून रात्रीच्या वेळी मोटारी लावल्यास मासिक पासच्या धर्तीवर पैसे भरावे लागणार आहेत. याबाबतचे धोरण समितीने निश्चित केले.
स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगतापांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महिला सबलीकरण, फायबरची शौचालये, अभय योजना, पाणीपुरवठा, नळजोड बिले, शाळांच्या दुरवस्था आदी विषयांवरील चर्चेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील रस्ते अंधारात आहेत, स्मशानभूमीत दिवे नाहीत, वारंवार तक्रार करूनही विद्युत विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही, अशा तक्रारी सदस्यांनी केल्या. तेव्हा भरारी पथकांच्या तपासणीद्वारे आपल्याला याबाबतची माहिती मिळाल्याचे सांगत अशा तक्रारींकडे कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असा दम आयुक्तांनी भरला.
पार्किंगचे धोरण ठरवताना वाहनतळांच्या जागांवर दुचाकींसाठी पहिल्या दोन तासाकरिता तीन रूपये व त्यापुढील प्रत्येक तासासाठी ४ रूपये, असा दर निश्चित करण्यात आला. तसेच, शहरातील निगडी, भोसरी, िपपरी व चिंचवडगाव येथील उड्डाणपुलाखाली दुचाकींना प्रत्येक तासासाठी दोन रूपये व चारचाकींसाठी १० रूपये शुल्कआकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री उड्डाणपुलांखाली मोठय़ा प्रमाणात वाहने लावली जातात, त्यांनाही आता शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय, महापालिकेचे दोन कोटी रूपये वाचविल्याबद्दल अविनाश देव, संभाजी ऐवले, अशोक बोंगीर, नितीन ठोंबरे, धनश्री घारेकर या अधिकाऱ्यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay for night parking under overbridges in pimprinigdibhosari
First published on: 07-08-2013 at 02:35 IST