पुणे : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून अभियंता पायल झांबरे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अक्षयला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने अक्षयला शनिवारपर्यंत (७ नाेव्हेंबर) कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
हुंड्यासाठी छळ केल्याने पायल अक्षय झांबरे (वय ३४) हिने २ नोव्हेंबर रोजी मुकुंदनगर भागातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३५, रा. मंगलमय इमारत, झांबरे पॅलेस जवळ, मुकुंदनगर), सासू मंगल झांबरे (वय ५८), सासरे अरविंद झांबरे (वय ६५) आणि नणंद अक्षता झांबरे-निमन (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पायलचा भाऊ ऋषीकेश पवार (वय ३१, रा. खेड शिवापूर) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायल आणि अक्षय यांचा २०१९ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी पायलचा छळ सुरू केला. माहेरून पैसे, सोने आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावण्यात आला. शारीरिक आणि मानसिक छळ असह्य झाल्याने पायलने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अक्षयला अटक करून मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. ‘आरोपीने केलेला हा गुन्हा महिला अत्याचार आणि हुंडाबळी अशा गंभीर अपराधांमध्ये मोडत आहे. छळामुळे उच्चशिक्षित महिलेने आत्महत्या केली. पायल आणि अन्य आरोपींमध्ये वाद सुरू असताना अटक आरोपी कोठे होता, त्याची भूमिका काय होती आणि त्याने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला का, याचा तपास करायचा आहे. पायल रात्री घरातून बाहेर पडल्यानंतर आरोपींनी तिचा शोध घेतला का, वेळोवेळी मागितलेले पैसे, दागिने व मौल्यवान वस्तूंचा आरोपींनी कसा वापर केला, घटनेच्या दिवशी झालेल्या वादानंतर शेजारी आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तपासासाठी आरोपी पती अक्षयला पोलीस कोठडी देण्यात यावी,’ असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांनी केला.
पायलचा भाऊ फिर्यादी ऋषीकेश पवार यांच्याकडून ॲड. पुष्कर पाटील, ॲड. ऋतुराज पासलकर, ॲड. आकाश कामठे यांनी बाजू मांडली.
