पुणे : माहेरहून पैसे आणण्याची मागणी करून अभियंता पायल झांबरे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू-सासऱ्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहा साकळे यांनी दोघांना शनिवारपर्यंत (७ नाेव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पायल अक्षय झांबरे (वय ३४) हिने २ नोव्हेंबर रोजी मुकुंदनगर भागातील घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी पती अक्षय अरविंद झांबरे (वय ३५, रा. मंगलमय इमारत, झांबरे पॅलेस जवळ, मुकुंदनगर), सासू मंगल झांबरे (वय ५८), सासरे अरविंद झांबरे (वय ६५) आणि नणंद अक्षता झांबरे-निमन (वय ३०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी पायलचा पती अक्षय याला मंगळवारी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (७ नोव्हेंबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पायलच्या आत्महत्येनंतर सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे हे खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतली. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. ‘गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. हुंड्याची कथित मागणी आणि प्रत्येक आरोपींची भूमिका, घटनाक्रम अशा मुद्द्यांबाबत सखोल तपास करण्यासाठी आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी करण्यात यावी’, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्नेहा साकळे यांनी दिले.

आत्महत्येपूर्वी संदेशात आरोपींची नावे

‘आरोपींनी पैसे आणि सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून पायलचा छळ केला. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. आत्महत्येपूर्वी पायलने माहेरकडील नातेवाईकांना संदेश पाठविला होता. या संदेशात आरोपींची नावे नमूद करण्यात आली होती. आरोपींची भूमिका तपासणे, तसेच त्यांची एकत्रित चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी देण्यात यावी’, अशी विनंती सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती आणि तक्रारदारांचे वकील ॲड. पुष्कर पाटील, ॲड. ऋतुराज पासलकर यांनी युक्तिवादात केली.

नातेवाईकांचे न्यायालयाबाहेर आंदोलन

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी शिवाजीनगर न्यायालयासमोर आंदोलन केले. ‘हुंड्यासाठी आमच्या मुलीचा बळी गेला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी’, अशी मागणी नातेवाईकांनी केली.