पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील शंभरहून अधिक सदनिका असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित करण्याबाबत महापालिकेने तीन वेळा नोटिसा बजावूनही ९९ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ बंदच असल्याचे निदर्शनास आले आहे. विविध कारणे पुढे करून ‘एसटीपी’ चालू ठेवण्यास नकार दिला जात आहे. ‘एसटीपी’ सुरू न करणाऱ्या सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यासह दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूंनी विस्तारत असून, लाेकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत शहरवासीयांना ६५० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी एका दिवसाला दिले जात आहे. मात्र, त्यानंतरही शहरातील अनेक मोठ्या साेसायट्यांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. वाढत्या उन्हामुळे कूपनलिका, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विस्कळीत, अपुरा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारींचा पाऊस सारथी हेल्पलाइनवर पडत आहे. त्यातून महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.
३९५ सोसायट्यांमधील एसटीपी कार्यान्वित
एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) वीस हजार चौरस मीटरपुढील क्षेत्रफळावरील, शंभर सदनिका आणि दररोज वीस हजार लिटर पाण्याचा वापर करणाऱ्या गृहनिर्माण सोसाट्यांना पाण्याचा पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शहरात ४९४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांपैकी ३९५ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत, तर वारंवार आवाहन करूनही ९९ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंदच आहेत.
नोटिसांकडे दुर्लक्ष
‘एसटीपी’ बंद असलेल्या ९९ साेसाट्यांना तीन वेळा नोटिसा दिल्या आहेत. त्यानंतरही या साेसायट्यांनी खर्चासह विविध कारणे देऊन ‘एसटीपी’ बंद ठेवले आहेत. त्यामुळे आता पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.
नोटिसा दिल्यानंतरही ९९ सोसायट्यांमधील एसटीपी बंद असल्याचे आढळून आले आहे. सोसायटीधारकांनी ‘एसटीपी’ प्रकल्प सुरू करावेत. अन्यथा पाणीपुरवठा खंडित करण्यासह दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
