पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाची नस्ती (फाइल) आता पाच अधिकाऱ्यांकडे जाणार आहे. पाच अधिकाऱ्यांकडून ही नस्ती तपासणी जाणार आहे. सहायक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त असा प्रवास प्रशासन विभागाच्या नस्तीचा होणार आहे. एक उपायुक्त आणि दोन सहायक आयुक्तांच्या कामकाजतही फेरबदल करण्यात आले आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे बदल केले आहेत.
महापालिकेतील प्रशासन विभाग महत्त्वाचा आहे. कर्मचाऱ्यांच्या बढत्या, बदल्या, नोकरभरती, प्रशासकीय कारवाया या विभागामार्फत केल्या जातात. सह आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी होती. त्यांच्याकडून आयुक्तांकडे नस्ती जात होती. परंतु, १५ एप्रिल रोजी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त, सह आयुक्तांच्या कामकाजाचे फेरवाटप केले. सह आयुक्त लोणकर यांना प्रशासन विभागाचे विभागप्रमुख केले. त्यांच्यावर अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांचे नियंत्रण ठेवण्यात आले. त्यात सोमवारी बदल करण्यात आला. उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे प्रशासन विभागाची जबाबदारी सोपविली.
प्रशासनात सहायक आयुक्त अजिंक्य येळे पूर्वीपासून कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासनातील नस्तीचा प्रवास सहायक आयुक्त, उपायुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त असा होणार आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन, अभिलेख कक्षाचे सहायक आयुक्त परशुराम वाघमोडे यांच्याकडे ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी दिली आहे. तानाजी नरळे यांच्याकडून ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी काढून घेतली. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन, कामगार कल्याण आणि अभिलेख कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला गती
‘पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवरील कारवाईला गती द्यावी, कठोर कारवाई करावी,’ अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आयुक्तांनी अतिक्रमण कारवाईचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त राजेश आगळे, अण्णा बोदडे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सरगर, अजिंक्य येळे, किशोर ननावरे, पूजा दुधनाळे बैठकीला उपस्थित होते. अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण कारवाई, नाल्यावरील अतिक्रमण निर्मूलनाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधातील प्रस्तावित कारवाईची माहिती आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी घेतली.
‘शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईचा नियमित आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाहणी करावी. रस्त्यावर स्टॉल उभारणारे फेरीवाले, पथारीवाल्यांवरदेखील कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या, तसेच शहराच्या नियोजनबद्ध विकासाच्या दृष्टीने ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावी,’ अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
