Pimpri Chinchwad Update: गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेली पिंपरी-चिंचवड महापालिका आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून, पदाधिकाऱ्यांच्या दालनांना नागरिकांच्या-लोकप्रतिनिधींच्या राबत्याचे वेध लागले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपून चार वर्षांनी नगरसेवकांच्या हाती कारभार जाणार आहे. सहा फेब्रुवारी रोजी महापौरांची निवड होणार आहे. त्या दृष्टीने चार वर्षांपासून बंद असलेली पदाधिकाऱ्यांची दालने खुली केली असून, ती सज्ज करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. दालने, महासभेचे सभागृह स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.

भाजपने ८४ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेता, स्थायी समिती सभापती तसेच, शिक्षण, विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा, क्रीडा या विषय समिती सभापती या पदावर भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागणार आहे.

विराेधी पक्षनेते पद राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला मिळणार आहे. प्रशासकीय राजवटीत महापालिका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील पदाधिकाऱ्यांच्या काही दालनाचा वापर अधिकाऱ्यांकडून केला जात हाेता. सत्तारुढ पक्षनेते, विराेधी पक्षनेते, उपमहापाैर, विधी समितीसह विविध समित्यांची दालने अधिकाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली हाेती. ही दालने रिकामी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

महापाैर, स्थायी समिती अध्यक्षांचे दालन चार वर्षे कुलूपबंद हाेते. आता पदाधिकारी येणार असल्याने या दाेन्ही दालनांसह सर्व दालने सज्ज करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांच्या दालनासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये स्वीय सहायक, मुख्य लिपिक, लिपिक, वाहनचालक, शिपाई यांची नेमणूक केली जाते. एकूण ३५ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत.

अधिकाऱ्यांसाठी दालनाची शाेधाशाेध

सत्तारुढ पक्षनेत्याच्या दालनात उपायुक्त अण्णा बोदडे, क्रीडा समिती सभापतीच्या दालनात उपायुक्त संदीप खाेत, विराेधी पक्षनेत्याच्या दालनातून सहायक आयुक्त अतुल पाटील आणि विधी समिती सभापतीच्या दालनातून विशेष अधिकारी किरण गायकवाड कामकाज करत हाेते. त्यांच्यासाठी आता नवीन दालनांची व्यवस्था करावी लागणार आहे.

पदाधिकाऱ्यांसाठीची दालने सुसज्ज केली जात आहेत. पदाधिकाऱ्यांच्या दालनातून कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी नवीन दालनांची व्यवस्था करण्यात येईल. लवकरच दालन वाटप समितीची बैठक घेण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खाेराटे यांनी सांगितले.