पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठी थकबाकीदारांकरिता ‘अभय’ योजना आणली आहे. विलंब दंडाची ९० टक्के रक्कम माफ केली जाणार असून ही योजना १ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीसाठी लागू असणार आहे. या योजनेचा दोन लाख १२ हजार ४४० मालमत्ता धारकांना लाभ होणार असून ४११ कोटी रुपयांचा दंड माफ होणार आहे. थकबाकी एक रकमी भरली, तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

याबाबतची माहिती महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर योगेश बहल, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार यावेळी उपस्थित होते. शहरात निवासी, व्यावसायिक, औद्याेगिक, माेकळे भूखंड, मिश्र अशा सात लाख ३२ हजार २९६ मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांपैकी पाच लाखांहून अधिक मालमत्ता धारकांनी ७४७ काेटी रूपयांच्या कराचा महापालिका तिजाेरीत भरणा केला आहे.

विभागाला चालू आर्थिक वर्षात एक हजार काेटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. निवडणुकीच्या दोन महिन्यांच्या कालावधीत कर वसुली थंडावली होती. दोन लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांनी एक हजार ३९४ कोटी ८७ लाखांचा कर भरला नाही. त्यामुळे महापालिकेने कर वसुलीसाठी अभय योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी तसेच औद्योगिक व मोकळ्या जागांची थकबाकी एक रकमी भरल्यास बिलंब दंडावर ९० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यासाठी १ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत कराचा पूर्ण भरणा करणे आवश्यक असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

१३९५ कोटींची थकबाकी

निवासी एक लाख ८२ हजार २७, बिगरनिवासी १८ हजार २८४, मिश्र पाच हजार २३३, औद्योगिक एक हजार ३४१, मोकळ्या जमिनी पाच हजार ३०८ आणि इतर २४७ अशा दोन लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांकडे एक हजार ३९४ कोटी ८७ लाखांची थकबाकी आहे.

मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत नागरिक जागरुक नाहीत. विकास, सुविधा पाहिजेत, तर कराचाही वेळेत भरणा केला पाहिजे, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले. मालमत्ताधारकांनी थकबाकीसह सर्व कराचा भरणा केल्यानंतरच ९० टक्के विलंब दंड माफ होईल. ही योजना ३१ मार्च पर्यंतच असणार आहे. या योजनेचा नागरिकांना लाभ घेऊन कर भरावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आहे.