पिंपरी: शहरवासियांनी पथदिवे खांब व विद्युत यंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये, खांबाला तसेच फिडरपिलरला स्पर्श करु नये, पथदिवे खांबातून विनापरवाना वीज घेऊ नये, असे आवाहन पिंपरी पालिकेने केले आहे. अशा कृत्यामुळे जीवितास धोका होऊ शकतो तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी म्हटले असून सर्वांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पालिकेच्या वतीने शहरातील सर्व पथदिव्यांच्या खांबांची तपासणी करण्यात आली. विजेच्या खांबाचा झटका बसणे, गंजलेला व धोकादायक खांब, तुटलेला बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास नागरिकांनी महापालिकेला कळवावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरीता पालिका कार्यक्षेत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम पालिकेमार्फत करण्यात येते. सध्या सर्व खांबांची तपासणी करण्यात आली आहे. धोकादायक परिस्थितीत एकही पोल आढळून येणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. या कामांत काही उणीवा, त्रुटी अथवा असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास नागरिकांनी ६७३३३३३३ तथा ८८८८००६६६६ या संपर्क दुरध्वनीवर कळवावे, असे विद्युत विभागाचे सह शहर अभियंता संदेश चव्हाण यांनी सांगितले. नागरिकांनी सुरक्षिततेबाबत महापालिकेने दिलेल्या सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. जनावरे खांबांना बांधू नयेत, कपडे वाळत घालण्यासाठी खांबांना तारा बांधु नये, बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये, खांबांना फलक लावू नये, कोणत्याही प्रकारची केबल अथवा तार खांबावरुन ओढु नये, असे आवाहन चव्हाण यांनी केले.