पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढते जलप्रदूषण आणि काही भागांत पिण्याच्या पाण्यात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाण्याच्या तपासणीसाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिण्याचे आणि नद्यांच्या पाण्याची तपासणी करण्यासाठी एका प्रयोगशाळेची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा या तिन्ही नद्यांमधील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नाले, औद्योगिक सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी या नद्यांमध्ये मिसळते. त्यामुळे नद्यांमधील पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या नद्यांमध्ये प्रदूषण वाढल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. शहराला मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणातील पाणी पवना नदीतून रावेत बंधाऱ्यावरून आणि आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून उचलले जाते. त्यावर निगडी, चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून शहरातील नागरिकांना वितरित केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहराच्या विविध भागांतून गढूळ, दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.
अनेक ठिकाणी पाणी वाहिन्यांमध्ये गळती होत असल्याने सांडपाण्याचे मिश्रण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने पिण्याच्या पाण्याची सातत्याने तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. दोघांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यांपैकी एका संस्थेची २१ लाख सहा हजार ६२१ रुपयांची निविदा स्वीकारली आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समिती सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
शहरातील पिण्याच्या पाण्याचे, नद्यांमधील पाण्याचे नमुने तपासले जाणार आहेत. या तपासणीमुळे नद्यांमधील प्रदूषणाची अचूक स्थिती समोर येण्यास आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे तपासण्यास मदत होईल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी केले.
शहराला दररोज होणारा पाणीपुरवठा
पवना धरण – ५५० दशलक्ष लीटर
आंद्रा धरण – ८० दशलक्ष लीटर
एमआयडीसी – २० दशलक्ष लीटर
एकूण – ६५० दशलक्ष लीटर
भामा आसखडचे काम संथगतीने
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी आणण्याचे महापालिकेने हाती घेतलेले काम संथगतीने सुरु आहे. डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना अशुद्ध जलउपसा केंद्र, पंपिंग स्टेशन, जलवाहिनीची कामे अद्यापही सुरू आहेत. ठेकेदाराला दिलेल्या एक वर्षाच्या (डिसेंबर २०२५) मुदतीतही काम पूर्ण होणार नसल्याने आता प्रकल्पास मार्च २०२६ चा नवीन मुहूर्त ठरविण्यात आला आहे.
सहा वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा
सर्वांना मुबलक व पुरेसे पाणी मिळण्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१९ मध्ये काही दिवसांसाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. काही दिवसांसाठीचा एक दिवसाआडचा पाणीपुरवठा पुढे कायम ठेवण्यात आला आहे. सहा वर्षे होत आले, तरी एक दिवसाआडच पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शहरातील विविध भागातून विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी येत आहेत. वाढीव पाणी मिळत नाही, तोपर्यंत दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे प्रशासन सांगत आहे.
