पिंपरी : प्रशासकीय अनास्था, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता मिळण्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय नूतनीकरणाच्या कामामुळे दहा वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद आहे. आतापर्यंत २० कोटींचा खर्च करून पहिल्या दोन टप्प्यांतील स्थापत्यविषयक कामे पूर्ण झाली आहेत. तिसऱ्या टप्प्यातील कामाला अद्याप सुरुवात झाली नसून, आणखी वर्षभर संग्रहालयास टाळेच पाहावे लागण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पशुपक्ष्यांची माहिती व्हावी, या उद्देशाने महापालिकेने चिंचवड येथील संभाजीनगरमध्ये ‘एमआयडीसी’च्या सात एकर जागेमध्ये १९८९ मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालय उभारले. या संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी मे २०१६ ला सुरुवात झाली. तेव्हापासून संग्रहालयाला टाळे आहे. प्राणिसंग्रहालयासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सर्पोद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. संग्रहालयावर आतापर्यंत दाेन टप्प्यांत २० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. दहा वर्षे हाेऊनही प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले नसून संग्रहालयास टाळे आहे.
मोजकेच प्राणी शिल्लक
बहिणाबाई प्राणिसंग्रहालयात विषारी आणि बिनविषारी साप, अस्वल, अजगर, मगरी, कासव, मोर, बदक, पोपट, कॉकपीट, लव्हबर्ड असे विविध प्राणी, पक्षी होते. सध्या साप, मगर, मोर, घुबड, लव्हबर्ड आहेत. प्राणिसंग्रहालयाचे काम सुरू होण्याआधी काही प्राणी पुण्यातील प्राणिसंग्रहालयाला देण्यात आल्याचे सांगितले जाते.
मान्यतेअभावी काम रखडले
तिसऱ्या टप्प्यात स्थापत्यविषयक, पाणी, लँडस्केपिंग, सीमाभिंतीची उंची वाढविणे, प्राण्यांच्या रुग्णालयातील कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या २४ काेटींच्या खर्चाला मार्च २०२५ मध्ये मान्यता देण्यात आली. परंतु, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता मिळाली नसल्याने अद्याप काम सुरू करण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दाेन टप्प्यांत झालेले काम
विविध प्राण्यांसाठी प्राणी घाट, प्राणी घर आणि पिंजरा क्षेत्र, तसेच साहित्य ठेवण्यासाठीची खोली, कर्मचारी सदनिका, प्राणी जळण क्षेत्र आणि शवविच्छेदन क्षेत्र निवारा, प्रवेशद्वार, भूमिगत जलकुंभ (टाकी), तिकीटघर, संरक्षण भिंत, रंगकाम, टेन्साइल रूफिंग, संचालकांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण आदी कामे पूर्ण झाली आहेत.
प्राणिसंग्रहालयातील तिसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यास मान्यता मिळण्याकरिता केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पत्र पाठविले आहे. त्यांची मान्यता मिळताच कामाला सुरुवात करण्यात येईल. मान्यतेनंतर वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांनी सांगितले.
प्राणिसंग्रहालयात सध्या १८५ प्राणी आहेत. त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. सध्या या ठिकाणी प्राण्यांसाठी पूरक आणि आवश्यक ती कामे करून घेण्यात येत आहेत, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी सांगितले.
संग्रहालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना प्राणी, पक्ष्यांची माहिती मिळत नाही. त्यामुळे शहरातील नागरिक पुण्यातील प्राणिसंग्रहालयात जातात. संग्रहालयाच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे स्थानिक नगरसेवक तुषार हिंगे यांनी सांगितले.
