PCMC BJP Group Leader: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचा गटनेता हा सभागृह नेता असणार आहे. त्यामुळे शितोळे हे सभागृह नेते असणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. भाजपचे सर्वाधिक ८४ नगरसेवक निवडून आले आहेत. प्रशांत शितोळे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. प्रभाग ३२ सांगवी गावठाणमधून तीनवेळा निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभाग ३२ सांगवी गावठाणमधून ते भाजपकडून निवडून आले आहेत. त्यांची ही चौथी टर्म आहे. प्रशांत शितोळे हे आमदार महेश लांडगे यांचे मित्र आहेत. भाजपने शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे. गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा गटनेता हा सभागृह नेता असणार आहे. त्यामुळे शितोळे हे सभागृह नेते असणार आहेत.
भाजपचा गट नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
महापौरपदही चिंचवडकडे?
गटनेता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील केल्यानंतर आता महापौरपदही याच मतदारसंघात राहण्याची शक्यता आहे. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे, रवी लांडगे, नितीन लांडगे हे महापौरपदासाठी इच्छुक आहेत. चिंचवड मतदारसंघाकडे महापौरपद ठेवल्यास शत्रुघ्न काटे आणि राहुल कलाटे यांच्यात महापौरपदासाठी चुरस असणार आहे. महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. स्थायी समितीचे अध्यक्षपद भोसरी मतदारसंघाकडे राहण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी कोणाची वर्णी लागणार?
महापालिकेतील गटनेता निवडण्यासाठी अजित पवार यांचे स्वीय सहायक विकास पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नगरसेवकांची मंगळवारी बैठक झाली हाेती. यामध्ये तीन ते चार नावांवर चर्चा झाली हाेती. गटनेता निवडण्याचे सर्व अधिकारी अजित पवार यांना देण्याचा ठराव झाला हाेता. पाटील यांच्यामार्फत नावे अजित पवार यांच्याकडे दिली जाणार हाेती. परंतु, बुधवारीच अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना विचारून राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गटनेता निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचा गटनेता महापालिकेचा विराेधी पक्षनेता असणार आहे. या पदासाठी प्रभाग क्रमांक २० मधील चारही नगरसेवक निवडून आणणारे पॅनेल प्रमुख संदीप वाघेरे यांच्यासह माजी विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर, माजी महापाैर वैशाली घाेडेकर इच्छुक आहेत. यांपैकी कोणाची गटनेतेपदी वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक?
महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी यशस्वी रणनिती अवलंबून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली. भाजपचे सर्वाधिक ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.

