पिंपरी : बोगस उपसूचनांच्या आधारे ठेकेदारांना ६० कोटींची देयके दिल्याचा व ठेवींच्या गुंतवणुकीस विलंब केल्याने आर्थिक नुकसान झाल्याचा बोगस उपसूचना प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने ठेवलेला ठपका आणि जबरदस्तीने रुजू होण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा महापौरांनी दिलेला इशारा या पार्श्वभूमीवर मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी पुन्हा रुजू होणे टाळले. अर्जित रजा २४ मे रोजी संपल्यानंतरही जैन रुजू झाले नाहीत. दालनातील साहित्यही बुधवारी त्यांनी घरी नेले आहे. त्यामुळे मुख्य लेखा व वित्त अधिकारीपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाने २०२५-२६ या अर्थसंकल्पामध्ये १४ बोगस उपसूचनांच्या आधारे संबंधित कामाच्या तरदुतीमध्ये वाढ-घट करुन ६० कोटी १८ लाखांची देयके ठेकेदारांना दिली आहेत. ठरावीक दिवसांसाठीच महापालिकेच्या ठेवी ठेवल्याने आणि ठेवींची पुनर्गुंतवणूक करताना विलंब केल्याने व्याजातून मिळणाऱ्या ४० लाख ५७ हजार ६४३ रुपयांचे नुकसान झाल्याचे चौकशीतून उघडकीस आले. याला मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.
महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) त्यांचा सक्तीच्या रजेचा आदेश रद्द केला होता. त्यानंतर जैन हे २४ मे पर्यंत अर्जित रजेवर गेले होते. परंतु, रजा संपल्यानंतरही २५ मे रुजू ते पुन्हा महापालिकेत रुजू झाले नाहीत. लेखा अधिकारी म्हणून पुन्हा ते चालणार नसून बळजबरीने महापालिकेत येण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापौर रवी लांडगे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर जैन यांनी रुजू होणे टाळले. बुधवारी जैन यांनी महापालिकेतील दालनातील साहित्य शिपायामार्फत घरी नेले आहे. त्यामुळे आता नवीन लेखा अधिकारी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आयुक्तांकडून मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रयत्न?
बोगस उपसूचना प्रकरणामुळे लेखा विभाग, महापालिकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे आर्थिक शिस्त आवश्यक आहे. त्यासाठी अनुभवी अधिकारी नियुक्त करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. परंतु, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एका महापालिकेत बरोबर काम केलेल्या विश्वासू अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, महापालिकेचे पद संचालक दर्जाचे असून संबंधित अधिकारी सह संचालक आहेत.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन २४ मे पर्यंत अर्जित रजेवर होते. त्यांची रजा संपली आहे. ते पुन्हा रुजू झाले नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
