पिंपरी : वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील जलद वाहतूक सेवा (बीआरटी) मार्ग आता तोडण्याची चाचपणी सुरू आहे. बीआरटी मार्गाची दुरवस्था, बसची कमतरता, अर्बन स्ट्रीट डिझाइनमुळे अरुंद झालेले रस्ते आणि त्यातून होणारी वाहतूककोंडी यामुळे भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन बीआरटी मार्ग हटविण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा विचार सुरू आहे.

प्रशस्त रस्ते, मोठे उड्डाणपूल अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातही वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तो सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम) योजनेंतर्गत शहरात ६० किलोमीटर अंतरावर बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले. परंतु, तेच वाहतूककोंडीचे कारण बनले आहेत. मुख्य रस्त्यांवर बीआरटी मार्ग तयार करण्यात आले. मात्र, त्या मार्गात बस दिसत नाही. बीआरटीमुळे सेवा रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडते. खासगी वाहनांचा बीआरटीतून प्रवास वाढला आहे. मार्गात विविध कामांसाठी सातत्याने खोदकाम केले जात आहे. दुरुस्तीसाठी मार्ग वारंवार बंद केला जातो. बसची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी बीआरटी मार्ग हटविण्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

शहरातील बीआरटी मार्ग

निगडी ते दापोडी, सांगवी-किवळे, काळेवाडी फाटा ते चिखली, नाशिक फाटा ते वाकड आणि भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक अशा ६० किलोमीटर मार्गावर सद्य:स्थितीत बीआरटी धावते. त्यांपैकी निगडी ते दापोडी मार्गाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, दिवसाला अडीच लाख प्रवासी त्याचा लाभ घेत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. परंतु, महामेट्रोच्या कामामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील बीआरटी सध्या अनेक ठिकाणी बंद आहे.

मार्गावर ६०० कोटींचा खर्च

बीआरटी मार्ग व थांबे उभारण्यासाठी महापालिकेने ६०० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. बीआरटी मार्गाचे रस्ते विकसित करण्यास जास्त खर्च झाला असून, ‘जेएनएनयूआरएम’च्या निधीतून हा खर्च केल्याचे प्रशासनाने सांगितले.

अरुंद रस्त्यांमुळे कोंडीत भर

प्रशस्त रस्त्यांवर बीआरटी मार्ग तयार केल्याने सेवा रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. त्यातच महापालिकेकडून अर्बन स्ट्रीट डिझाइन ही जागतिक पातळीवरील संकल्पना राबविण्यात आली आहे. त्यात रस्ते अरुंद करून पदपथ व सायकल मार्ग उभारले आहेत. परिणामी, रस्ते आणखी अरुंद झाले. त्यातून वाहतूककोंडीत भर पडत आहे.

भविष्यातील वाहतूककोंडीचा विचार करता बीआरटी तोडण्याबाबत विचार केला जाईल. त्या संदर्भात लवकरच आयुक्तांबरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. शहरात वाहतूककोंडी होत आहे. वाढती कोंडी सोडवण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यासाठी बीआरटीही तोडण्याचा विचार असल्याचे नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

सार्वजनिक बससेवेला सक्षम सुविधा देणे आवश्यक आहे. सेवा रस्त्यावरून बस धावल्यास प्रवास संथ गतीने होईल. प्रवासी कमी होतील. सार्वजनिक वाहतुकीचे माफक दर असलेले पाच पर्याय दिले पाहिजेत. पर्याय नसल्याने खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. पर्याय न देता बीआरटी मार्ग हटविणे चुकीचे होईल, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.