पिंपरी पालिकेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सोमवारी मांडण्यात येणार आहे. स्थायी समिती सभागृहात साडेअकरा वाजता होणाऱ्या विशेष सभेत आयुक्त राजीव जाधव हे स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे यांना अर्थसंकल्प सादर करणार आहेत. २०१४-१५ चे अंदाजपत्रक ‘जेएनयूआरएम’च्या २१०६ कोटींसह एकूण ३४०० कोटी खर्चाचे होते, तेव्हा कोणतीही करवाढ करण्यात आली नव्हती. ‘एलबीटी’ तून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या मर्यादा स्पष्ट झाल्याने मिळकतकर, पाणीपट्टी, बांधकाम परवानगी आदींच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी वेगळे चित्र आहे. एलबीटी रद्द करून सेवावस्तू कर लागू करण्यात येणार आहे, याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे उत्पन्नाच्या सर्वाधिक भक्कम स्त्रोत असलेल्या करप्रणालीविषयी संभ्रमावस्था आहे.