पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी सादर केलेल्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने ४०० काेटींच्या २५० उपसूचना दिल्या आहेत. तसेच, एखादा महत्त्वाचा प्रकल्प निधीअभावी रखडू नये, यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन, ठेवी माेडण्याचा विचार केला जाईल,’ अशी भूमिका स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी घेतली आहे.
महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा मूळ पाच हजार ६५५ कोटी ७३ लाख तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह नऊ हजार ३२२ कोटी १७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे यांच्याकडे २८ फेब्रुवारी राेजी सादर केला. या अर्थसंकल्पात एकही नवीन प्रकल्प नसल्यामुळे स्थायी समितीने अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आणि उपसूचनांद्वारे नवीन प्रकल्प सुचविण्यासाठी दाेन वेळा सभा तहकूब केली हाेती. साेमवारी स्थायी समितीची तहकूब सभा झाली. स्थायी समितीने ४०० काेटींच्या २५० उपसूचना देऊन अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष बारणे म्हणाले, ‘महापालिकेच्या पाच हजार ६९० काेटींच्या ठेवी आहेत. त्यापैकी एक हजार ४५५ काेटींच्या सर्वसाधारण ठेवी माेडता येऊ शकतात. एखादा माेठा प्रकल्प आला, तर सर्वसाधारण ठेवी माेडण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात येईल. प्रशासकाच्या अर्थसंकल्पात चारशे काेटी रूपयांची वाढ केली आहे. यामध्ये पवना जलवाहिनी, पवना नदी सुधार, वाहनतळ, फेरीवाला क्षेत्र, महिलांसाठी प्रशिक्षणासह विविध विकास प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबराेबर बांधकाम परवानगी विभागातून २०० काेटी, आकाशचिन्ह परवाना विभागातून ३४ काेटी, पाणीपट्टीतून २० काेटी यासह नव्याने नाेंदणी हाेत असलेल्या मालमत्तांच्या करातून माेठे उत्पन्न मिळेल.’
नगरसेवक निधीची संकल्पना
नगरसेवकांना प्रभागातील लहान-माेठी कामे करण्यासाठी प्रथमच नगरसेवक निधी संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ३२ प्रभागातील नगरसेवकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी २४ मार्चला सभा
स्थायी समितीने ४०० काेटींच्या २५० उपसूचनांसह अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे. या अर्थसंकल्पावर चर्चेसाठी २४ मार्च राेजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयाेजन करण्यात आले आहे.
