पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तत्कालीन आयुक्तांनी अर्थसंकल्पात (२०२६-२७) जुनी कामे पूर्ण करण्यावर भर देताना एकही नवीन प्रकल्प सुचविला नसताना स्थायी समितीने २२ नवीन कामांचा समावेश केला आहे. त्यात रतन टाटा संग्रहालय (म्युझियम गॅलरी), कलाकार, कामगार कट्टा, दिवंगत अजित पवार यांचा पुतळा व अजित सृष्टी, शहरातील प्रमुख रस्ते वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) मुक्त करण्यासह विविध कामांचा समावेश आहे.
महापालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षांचा मूळ पाच हजार ६५५ कोटी ७३ लाख रुपयांचा, तर केंद्र, राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह नऊ हजार ३२२ कोटी १७ लाख रुपयांचा अर्थसंकल्प तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केला होता. स्थायी समितीने ४०० कोटींच्या २०० उपसूचनांसह १६ मार्च रोजी अर्थसंकल्पाला मान्यता दिली होती. या अर्थसंकल्पावर मंगळवारी सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले.
‘प्रशासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात केवळ २०० कोटी रुपये नवीन आर्थिक वर्षांत विकासकामांसाठी मिळत होते. त्यामुळे बांधकाम परवानगी विभागातून २५८ कोटी, कर आकारणी आणि जाहिरात फलकाच्या दरामध्ये विकसित परिसरानुसार समतोल करण्यात येईल. त्यातून ३४ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल. पाणीपट्टीतून २० कोटी असे विविध विभागांतून ४१४ कोटी रुपयांची उत्पन्न वाढ अपेक्षित धरली आहे. अग्निशमन विभागाची स्थापत्य विषयककामे त्याच निधीतून केली जाणार आहे,’ असे बारणे यांनी सांगितले.
पवना बंदिस्त जलवाहिनीसाठी तरतूद
निधीअभावी पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामासाठी प्रशासनाने तरतूद केली नव्हती. परंतु, स्थायी समितीने ४० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पवना नदी सुधारसाठीही १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवीन कामे आणि तरतूद
- महिला, मुलींसाठी स्वसंरक्षण सक्षमीकरण केंद्र ( पाच कोटी)
- माता रमाई स्मारक (एक कोटी १५ लाख) डिजिटल शाळा (दोन कोटी)
- रतन टाटा संग्रहालय (दोन कोटी)
- महिलांसाठी सॅनिटरी पॅड, डिस्पोजल मशीन (दोन कोटी)
- दिवंगत अजित पवार यांच्या नावाने अजितसृष्टी (पाच कोटी)
- कलाकार कट्टा (दोन कोटी)
- कामगार कट्टा (चार कोटी)
- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आरोग्य सेवा हेल्पलाइन विकसित करणे (तीन कोटी)
- मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र (सहा कोटी)
- महापालिका इमारतींवर सोलर पॅनल बसविणे (पाच कोटी)
- सखल भागात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा (पाच कोटी)
- महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर मेमोग्राफी मशीन (एक कोटी)
- बेघरांसाठी घर (एक कोटी)
- फेरीवाला क्षेत्र (एक कोटी)
- सशुल्क वाहनतळ (एक कोटी)
- केजूबाई बंधारा येथे जलक्रीडा पर्यटन (चार कोटी)
- प्रमुख रस्ते वाहतूक नियंत्रण दिवे मुक्त (एक कोटी)
- ऑक्सिजन पार्क (दोन कोटी)
- नवीन प्रशासकीय इमारतीसाठी (पाच कोटी)
- मलनिस्सारण सुधारण (२० कोटी)
- विद्युत वाहने चार्जिंग स्थानके (एक कोटी पाच लाख)
- नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी दहा लाख विकासनिधी (१३ कोटी)
