पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकीय राजवट संपून नगरसेवकांची राजवट सुरू हाेत असल्यामुळे आगामी अर्थसंकल्पात शहरवासीयांना काय मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थायी समिती अध्यक्षांची फेब्रुवारी महिन्यात निवड न झाल्यास मार्च महिन्यात महापौरांकडे अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेत मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागू झाली होती. या कालाधीत तीन अर्थसंकल्प प्रशासकांकडून सादर करण्यात आले. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकीय पातळीवरच चालविण्यात आला. आर्थिक नियोजन, विकासकामे, तसेच निधीवाटपाचे निर्णय प्रशासकांच्या माध्यमातून घेण्यात आले. २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पही प्रशासकांनीच तयार केला आहे. प्रशासकांनी तयार केलेला अर्थसंकल्प लोकप्रतिनिधींना सादर केला जाईल. महापालिकेचा अर्थसंकल्प दर वर्षी २० फेब्रुवारीपूर्वी सादर केला जात हाेता. शुक्रवारी महापौरांची निवड होणार आहे. या विशेष सभेत स्थायी समितीसह विविध विषय समित्यांचे सदस्य निवडण्याचा प्रस्ताव विषयपत्रिकेवर ठेवण्यात आला आहे. या सभेत सदस्यांची निवड झाल्यास पुढील आठवड्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक होईल. असे झाल्यास स्थायी समिती अध्यक्षांकडेच अर्थसंकल्प सादर करण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्पासंदर्भात विभागप्रमुखांची बैठक घेत सूचना दिल्या होत्या. आगामी वर्षातील उत्पन्न, खर्च, प्रलंबित कामे, तसेच, नवीन विकासकामांचा समावेश असलेले प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागाकडून मागील वर्षातील प्रत्यक्ष खर्च, अपेक्षित महसूल, करआकारणी, अनुदाने, भांडवली व महसुली खर्चाचा तपशील मागवण्यात आला होता. सुरू असलेली विकासकामे, अपूर्ण प्रकल्प आणि मूलभूत सुविधांसाठी आवश्यक निधीची मागणीही स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले होते. त्यानुसार विभागप्रमुखांनी माहिती दिली असून, अर्थसंकल्पाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.
…तर महापौरांकडे अर्थसंकल्प
२८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समिती अध्यक्षांची निवड न झाल्यास आयुक्तांमार्फत अर्थसंकल्प महापौरांना सादर केला जाईल. अर्थसंकल्पाला महापौरांकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर त्याची एक एप्रिलपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.
अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत स्थायी समिती अध्यक्षांकडे अर्थसंकल्प सादर केला जातो. तोपर्यंत स्थायी समिती अध्यक्षांची निवड न झाल्यास मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत महापौरांकडे अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.

