पिंपरी : बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित ५० कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावांना स्थायी समितीने तहकुबी दिल्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. यापुढे स्थायी समितीमधील विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा करू नये, असा आदेश महापौर रवी लांडगे यांनी दिला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मार्च महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. महापौर रवी लांडगे अध्यक्षस्थानी होते. छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरात स्थापत्य आणि विद्युतविषयक कामे करण्यासाठीचे ५० कोटींचे दोन प्रस्ताव स्थायी समितीच्या ११ मार्चच्या सभेत तहकूब करण्यात आले. याकडे भाजपच्या स्थानिक नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी लक्ष वेधले.

‘भाजपची सत्ता असताना महाराजांच्या स्मारकाशी संबंधित विषय तहकूब होणे लाजिरवाणे आहे. विषयपत्रिकेवर प्रस्ताव येण्यापूर्वीच स्थायी समिती अध्यक्षांनी माहिती घेणे अपेक्षित होते,’ असे बोऱ्हाडे म्हणाल्या. ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक हे सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. पुतळ्याला विरोध नसून, निविदा रकमेला विरोध आहे,’ असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे यांनी, ‘एकाच कामाच्या दोन स्वतंत्र निविदा कशासाठी काढल्या,’ असा प्रश्न केला.

‘अनुभव नसलेल्या ठेकेदाराला काम देण्यात आले. चौथरा उभारल्यानंतर ऐन वेळी कामाचे स्थळ बदलले. त्यामुळे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. अद्याप जागेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झालेली नाही,’ असे शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या. ‘स्मारकाच्या कामामध्ये ‘रिंग’ केल्यास विरोध केला जाईल,’ असे भाजपचे संदीप कस्पटे म्हणाले.

राजकारण करू नये

‘निविदा प्रक्रियेबाबत समितीमधील सदस्यांना शंका होत्या. विरोधकांनी बदनामी करू नये. सविस्तर माहिती घेण्यासाठी विषय तहकूब केला. याचे राजकारण करू नये. यापुढे स्थायी समितीमधील विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यापूर्वी इतिवृत्त तपासावे, त्यानंतरच बोलावे,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे म्हणाले.

अस्मितेचा विषय तहकूब करू नका

‘छत्रपती संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा उभा राहत आहे, याचा सर्वांना अभिमान आहे. हा विषय अस्मितेचा आहे. महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असली, तरी अस्मितेचे कोणतेही काम थांबता कामा नये, याची स्थायी समितीमधील सदस्यांनी काळजी घ्यावी. शंकांचे निरसन अगोदरच करावे. कोणत्याही समितीत अस्मितेचा विषय तहकूब करू नये,’ अशी सूचना सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी केली. स्थायी समितीने योग्य निर्णय घ्यावेत. यापुढे स्थायी समितीमधील विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा करू नये, असे आदेश महापौर रवी लांडगे यांनी दिले.