पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ३८ लाख रुपयांच्या निविदा प्रकरणी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी अटक केली. प्रमोद सुधाकर ओंभासे (वय ५७, रा. प्राधिकरण, निगडी) असे अटक केलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ठेकेदार आहेत. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या देखभाल दुरुस्ती व नवीन जलवाहिनी टाकण्याच्या कामाची ९१ लाख ५७ हजार ६८ रुपयांची पाच कामे घेतली आहेत. त्या पाचही कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त करण्यासाठी महापालिकेसोबत करारनामा करणे गरजेचे होते. करारनाम्यावर कंपनीच्या वतीने सर्वांच्या आणि पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता व मुख्य अभियंता यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी तक्रारदारांनी नस्ती जमा केली होती.
त्यावेळी सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी निविदा रकमेच्या ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपये लाच मागितली. मात्र, तक्रारदारांनी काम झाल्यावर बघू, असे उत्तर दिले होते. त्यामुळे सहशहर अभियंत्यांनी पाच पैकी तीन निविदा नस्तीवर स्वाक्षऱ्या केल्या. उर्वरित नस्ती बर्याच दिवसांपासून मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे प्रलंबित होत्या. २९ मे २०२६ रोजी तक्रारदारांनी ओंभासे यांची भेट घेतली.
ओंभासे यांनी स्वाक्षरी करण्यासाठी ०.५ टक्के प्रमाणे ४५ हजार ७८५ रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने ११ जून रोजी तक्रारीची पडताळणी केली असता ओंभासे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच, यापूर्वीही तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांना गुरुवारी अटक केली. याबाबत संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घराचीही झाडाझडती
ओंभासे यांना अटक केल्यानंतर पथकाने त्यांच्या निगडीतील घरावरही धाड टाकली. कागदपत्रांसह इतर बाबींची झाडाझडती सुरू केली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले.
