पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ३८ लाख रुपयांच्या निविदा प्रकरणी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केलेल्या मुख्य अभियंत्याला शुक्रवारी पिंपरी न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रमोद सुधाकर ओंभासे (वय ५७, रा. प्राधिकरण, निगडी) असे पोलीस कोठडीत रवानगी केलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी ५७ वर्षीय ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. त्यानंतर एसीबीच्या पडताळणीत ओंभासे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, त्यांना गुरुवारी अटक केली.
शुक्रवारी ओंभासे यांना पिंपरी न्यायालयात हजर करण्यात आले. एसीबीने तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली. आरोपी आणि तक्रारदार यांच्यातील संभाषणातील आवाजाची पडताळणी करायची आहे. त्यासाठी आरोपीच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणी अधिकारी, कर्मचार्यांचा सहभाग आहे का, याबाबत चौकशी करायची आहे, अशी कारणे पोलिसांनी दिली. त्यावर न्यायालयाने ओंभासे यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. शनिवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बंगल्यासह दोन कोटीची मालमत्ता
एसीबीच्या पथकाने ओंभासे यांच्या निगडीतील तीन मजली बंगल्याची झडती घेतली असता बंगल्याच्या किंमतीसह सव्वालाखाची रोकड, २५ तोळे सोन्याचे दागिने, तीन मोटारी अशी दोन कोटी १९ लाख रूपये कितीची मालमत्ता आढळून आल्याचे एसीबीचे पोलीस उपअधिक्षक सतीश वाळके यांनी सांगितले.
सह शहर अभियंत्यासह तिघांची शनिवारी चौकशी
या लाच प्रकरणी पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता, संबंधित पाच कामे हाताळणारा लिपिक आणि प्रमोद ओंभासे यांच्या दालनातील शिपायाला उद्या शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले असल्याचे महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
