पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांचा स्वेच्छानिवृत्ती अर्ज मंजूर झाला असून उद्या (२८ फेब्रुवारी) ते कार्यमुक्त होणार आहेत. त्यामुळे शहर अभियंता कोण होणार, याबाबत जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. सद्यःस्थितीत तीन अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असून शहर अभियंतापदी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, बांधकामे अशा विविध विकास कामांच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख म्हणून महापालिकेतील शहर अभियंतापद प्रतिष्ठेचे आणि अतिमहत्त्वाचे आहे. त्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अत्यावश्यक असते. महापालिका सेवेतील अभियंत्यांची सेवाज्येष्ठतेनुसार शहर अभियंता पदावर वर्णी लागते.

विशेषतः सहशहर अभियंतापदी कार्यरत अधिकाऱ्यालाच पदोन्नती देऊन शहर अभियंतापदी नियुक्ती केली जाते. विद्यमान शहर अभियंता मकरंद निकम यांनी तीन महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती मिळविण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यांना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे. त्यामुळे तीन अधिकाऱ्यांमध्ये शहर अभियंतापदी नियुक्तीसाठी चुरस निर्माण झाली आहे.

महापालिका शहर अभियंतापदी सहशहर अभियंता पदावरील अधिकाऱ्याची सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने नियुक्ती केली जाते. मात्र, चार वर्षांपूर्वी शहर अभियंतापदाच्या समकक्ष मुख्य अभियंता पदाची निर्मिती केली. या पदाला शासनाने मान्यता दिली. त्या पदांवर सहशहर अभियंता पदावरील व्यक्तीलाच पदोन्नती दिली जाते. त्यामुळे सेवाज्येष्ठतेनुसार संजय कुलकर्णी आणि प्रमोद ओंभासे यांची मुख्य अभियंतापदी वर्णी लागली आहे. सद्यःस्थितीत सहशहर अभियंतापदी मनोज सेठिया कार्यरत आहेत. ते सेवाज्येष्ठ असून शहर अभियंतपदाकरिता पात्र ठरतात. परंतु, मुख्य अभियंता असलेले कुलकर्णी, ओंभासे हे दोघेही शहर अभियंता होण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांमध्ये शहर अभियंता होण्यासाठी चूरस निर्माण झाली आहे.

…तर आकृतीबंधात बदल

मुख्य अभियंता आणि शहर अभियंता ही दोन्ही पदे समकक्ष आहेत. या दोन्ही पदावर सह शहर अभियंत्याची पदोन्नती होती. त्यामुळे मुख्य अभियंत्याना शहर अभियंता करण्याचा निर्णय घेतल्यास महापालिका आकृतीबंधात बदल करावा लागणार आहे. मुख्य अभियंत्यानाच शहर अभियंता करण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी आकृतीबंधात बदल करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

शहर अभियंत्या पदाबाबत अद्याप निर्णय झाला नाही. याबाबत आयुक्तांशी चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले. शहर अभियंतापदी महापालिकेतीलच अधिकारी असला पाहिजे. राज्य सेवेतील अधिकाऱ्याला शहराची जास्त माहिती नसते. त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्याकडेच हे पद रहावे अशी भूमिका असल्याचे सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी मांडली.