पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ ठेवणे ही प्रशासनाबरोबरच नागरिकांची जबाबदारी आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापौर रवि लांडगे यांनी आरोग्य विभागाला दिला. शहरातील स्वच्छतेचा ‘रोड मॅप’ तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.

महापौर लांडगे यांनी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आरोग्य विभागाने शहरातील कचरासंकलन, कचऱ्याचे विलगीकरण, त्याची वाहतूक, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्ते साफसफाई, पाणी स्वच्छता यांसह विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती दिली. बैठकीस आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे, अतुल पाटील, किशोर ननवरे, अजिंक्य येळे, राजाराम सरगर, निवेदिता घार्गे, अश्विनी गायकवाड, पूजा दूधनाळे यांच्यासह आरोग्य निरीक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

उद्योगनगरी आणि गजबजलेल्या बाजारपेठांचे शहर असल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन, भोसरी, तसेच हिंजवडी माहिती व तंत्रज्ञाननगरीकडे जाणारे प्रमुख रस्ते दिवसभर वाहनांनी गजबजलेले असतात. त्यामुळे दिवसा स्वच्छता करणे मोठे आव्हान ठरते. ही अडचण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने रात्रपाळी स्वच्छता मोहीम अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेत मनुष्यबळासोबत आधुनिक यंत्रसामग्रीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मेकॅनिकल स्वीपिंग मशिनद्वारे मुख्य रस्त्यांवरील बारीक धूळ हटवली जाते.

 वॉटर स्प्रिंकलर्सच्या साहाय्याने रस्ते व दुभाजक धुऊन हवेतल्या धुळीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कचरा वाहतूक यंत्रणा रात्रीच कचरा डेपोपर्यंत पोहोचवली जात आहे. परंतु, महिला कर्मचाऱ्यांनाही रात्रीचे स्वच्छतेचे काम दिले जात आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रात्रीच्या स्वच्छता मोहिमेत त्यांना काम देऊ नये. रात्रीची स्वच्छता मोहीम कायम ठेवावी. त्यामध्ये केवळ पुरुष कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा, असा आदेश महापौर लांडगे यांनी दिला. आरोग्य विभागाला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही लांडगे यांनी दिली.

माझी वसुंधरा पुरस्काराबद्दल अभिनंदन

पिंपरी-चिंचवड महापालिकेला ‘माझी वसुंधरा’ हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे महापौर लांडगे यांनी अभिनंदन केले. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून, मोठी जबाबदारी असल्याचे सांगत पर्यावरणसंवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दिशेने सातत्याने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.