पिंपरी : सत्ताधारी भाजपची नावे निश्चित होत नसल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा जून महिन्यात दफ्तरी दाखल केलेला प्रस्ताव ऑगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर पुन्हा मान्यतेसाठी ठेवला आहे. त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सभेत स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार का, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासह भाजपमधील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँँग्रेसचे (अजित पवार) ३७, शिवसेनेचे (शिंदे) सहा आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. संख्याबळानुसार भाजपचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन असे दहा स्वीकृत नगरसेवक असतील. प्रशासनाने मार्च महिन्यात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया राबविली होती. प्रशासनाने मागविलेल्या मुदतीत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांचे अर्ज आले होते. परंतु, नावे निश्चित होत नसल्याने भाजपने अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. भाजपची नावे आली नसल्याने तत्कालीन आयुक्तांनी राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला होता.
भाजपकडून तीन महिने हा विषय तहकूब केल्यानंतर जूनमध्ये दफ्तरी दाखल करण्यात आला होता. अर्धवट असलेल्या प्रस्तावामध्ये दुरुस्ती करून सुधारित प्रस्ताव आणण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. परंतु, जूनपासून प्रशासनाने स्वीकृत नगरसेवक नियुक्तीसाठी कोणतीही प्रक्रिया राबविली नाही. भाजपच्या एकानेही अर्ज दाखल केला नाही. त्यांची कागदोपत्री प्रक्रिया झाली नाही. असे असताना महापौर रवी लांडगे यांच्या १२ ऑगस्टच्या पत्रानुसार दहा स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी पुन्हा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी सात नावे सभागृहात जाहीर करणार, की प्रस्ताव पुन्हा तहकूब करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सहा महिन्यांचा कालावधी वाया
प्रशासनाने मार्च महिन्यात स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव आणला होता. मात्र, सत्ताधारी भाजपचे सात नावांवर एकमत झाले नाही. त्यामुळे प्रस्तावच दफ्तरी दाखल केल्याने स्वीकृत नगरसेवकांचा सहा महिन्यांचा कालावधी वाया गेला आहे. स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर आला आहे. नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोअर कमिटीकडून नावे प्रदेश नेतृत्वाकडे पाठविली जातील. अर्जांची छाननीही करावी लागणार असल्याचे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
