पिंपरी : महापौर, उपमहापौर निवडीनंतर स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसाठीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीच्या हालचालींना वेग आला आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि गटनेत्यांची आज गुरुवारी (२६ फेब्रुवारी) बैठक होणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून स्वीकृत नगरसेवकांचा प्रस्ताव मान्यतेसाठी मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सामाजिक क्षेत्रातील सहा जणांनी स्वीकृत नगरसेवकपद मिळावे यासाठी नगरसचिवांकडे अर्ज दिले आहेत. त्यामुळे स्वीकृतपदी कोणाला संधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपचे ८४, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७, शिवसेनेचे (शिंदे) सहा आणि एक अपक्ष असे १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. एक अपक्ष नगरसेवक भाजपसाेबत आहे. महापालिकेत पूर्वी स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच हाेती. राज्य शासनाने मार्च २०२३ मध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या संख्येत वाढ केली. त्यानुसार पिंपरी महापालिकेत आता दहा स्वीकृत नगरसेवक हाेणार आहेत. एका स्वीकृत नगरसेवकासाठी १२.८ नगरसेवकांच्या मताचा काेटा निश्चित केला आहे. त्यानुसार भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार पक्षाचे किती स्वीकृत नगरसेवक होतील, याबाबतची माहिती नगरसचिवांनी सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना दिली आहे.
स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर गटनेत्यांची गुरुवारी बैठक होणार आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीचे निकष गटनेत्यांना सांगितले जाणार आहेत. त्यानुसार निकष प्राप्त असलेल्या व्यक्तींच्या नावांची स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याची शिफारस गटनेते आयुक्तांकडे करतील. गटनेत्यांकडून आलेल्या अर्जांची छाननी करून आयुक्त पात्र व्यक्तीची पक्षाच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वसाधारण सभेकडे करतील. सर्वसाधारण सभा यावर अंतिम निर्णय घेईल. आयुक्तांची शिफारस सर्वसाधारण सभेने अमान्य केल्यास त्याची कारणे द्यावी लागणार आहेत.
कोण होऊ शकते स्वीकृत नगरसेवक?
स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेद्वारे होत नाही. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रशासन, कायदा, वैद्यकीय, लेखापाल, अभियांत्रिकी पदवीधारक, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करणे अपेक्षित असते. मात्र, राजकीय पक्षांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच सामाजिक कार्य दाखवून स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जाते. स्वीकृत नगरसेवकाला भत्ते, महापालिका सभेत मुद्दे मांडण्याचे अधिकार असतात. केवळ मतदान प्रक्रियेत सहभाग घेता येत नाही.
इच्छुकांची मोर्चेबांधणी
पक्षासाठी निवडणुकीतून माघार घेणारे, पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करणारे आणि निवडणुकीत अपयश आलेल्यांनी स्वीकृत नगरसेवक पद मिळावे यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या दाेन प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखाेडी टाळण्यासाठी उमेदवारी न मिळालेल्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला हाेता. त्यामुळे दाेन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्याही माेठी आहे. भाजपकडून भविष्यातील राजकीय समीकरणे डाेळ्यासमाेर ठेवून स्वीकृत नगरसेवक पद देताना धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिन्ही विधानसभा मतदारसंघातील एका कार्यकर्त्याला संधी देण्याची चाचपणी सुरू आहे.
सहा जणांचे नगरसेवकपदासाठी अर्ज
नामदेव जाधव, कुणाल वक्टे, अशोक परदेशी, विक्रम पवार, डॉ. तात्यासाहेब उदुगुडे आणि सचिन दोनगहू यांनी स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याबाबत नगरसचिव कार्यालयाकडे अर्ज दिला आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीबाबत आयुक्त आणि गटनेत्यांची गुरुवारी बैठक होईल.
गटनेत्यांना स्वीकृत नगरसेवक निवडीबाबतची माहिती दिली जाईल. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवक निवडीचा विषय मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, असे महापालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले. स्वीकृत नगरसेवकपद सव्वा किंवा अडीच वर्षांसाठी द्यावे याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सभागृह नेते
प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

