पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाळीव श्वानाने चावा घेतला आहे. मुंबईत भावाच्या घरी गेल्यानंतर श्वानाने चावा घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील वर्षभरात तब्बल २८ हजार नागरिकांना भटक्या श्वानाने चावा घेतल्याची नुकतीच आकडेवारी समाेर आली आहे. महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेतही श्वानांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांसह विराेधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले हाेते. सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाने श्वानांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांना प्रतीकात्मक श्वान भेट दिला हाेता.याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘मुंबई येथे भावाच्या घरी गेलाे हाेता. त्यावेळी पाळीव श्वानाने चावा घेतला आहे. जास्त गंभीर असे काही नाही.’

श्वानांची संख्या संख्या लाखात, केवळ २१६ कॅनल

शहरात भटक्या श्वानांची संख्या एक लाख आहे. नेहरूनगर येथील ‘डॉग शेड’ मध्ये नसबंदीचे २१६ कॅनल आहेत. त्यात आजारी श्वानांसाठीचे ५० कॅनल आहेत. यामध्ये नसबंदीसाठी आणलेल्या श्वानांना पाच दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येते. त्यांनतर त्यांना शहरातच सोडले जाते. कॅनलची संख्या कमी असल्याने दररोज नसबंदी केलेल्या श्वानाचे कॅनल फुल असतात. कॅनल रिकामे झाल्यानंतर श्वानांना नसबंदी करण्यासाठी आणले जाते. कॅनल कमी असल्याने नसबंदी करण्याचे काम वेळखाऊ होते. त्यामुळे श्वानांच्या जन्मदरावर नियंत्रण ठेवता येत नाही.

उघड्यावर फेकलेल्या अन्नपदार्थामुळे श्वानांच्या संख्येत वाढ

शहरातील पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेते, मांस, चिकन विक्रेते व हॉटेल व्यावसायिक तसेच, रहिवाशी कचराकुंडी, गटार किंवा उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. त्यामुळे मोकाट व भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याचा दावा पशुवैद्यकीय विभागाचा आहे.

दहा महिन्यात २७ हजार ४५५ जणांना श्वानांचा चावा

शहरामध्ये भटक्या श्वानांनी चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना वाढल्या आहेत. भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरामध्ये मागील दहा महिन्यात २७ हजार ४५५ जणांना श्वानांची चावा घेतला आहे. महिन्याकाठी जवळपास एक हजार व्यक्तींना श्वानदंश होतो. दिवसाला केवळ ७१३ लस उपलब्ध असते. त्यामुळे लसीचीही कमतरता जाणवते.