पिंपरी : भेटीसाठी राखीव असलेल्या दिवशीही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे भेटत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी आयुक्त दालनासमोर गोंधळ घालून सुरक्षारक्षकांशी हुज्जत घातली. बैठकीसाठी तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी दालनातून बाहेर पडणाऱ्या आयुक्तांना नागरिकांनी घेराव घातला. यामुळे सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात आयुक्तांना बैठकीसाठी रवाना व्हावे लागले.
प्रशासकीय राजवटीमध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी तीन ते सायंकाळी सहा ही वेळ निश्चित केली हाेती. आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी त्यामध्ये एप्रिल महिन्यात कपात केली. नागरिकांना विविध कामासंदर्भात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आठवड्यातील केवळ मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी दुपारी चार ते सायंकाळी सहा ही वेळ निश्चित केली. भेटीच्या वेळेत विभागांतर्गत बैठकांचे, दौऱ्याचे आयोजन करू नये, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या.
मंगळवारी नागरिकांना भेटण्यासाठीचा राखीव दिवस होता. त्यामुळे दुपारी चार वाजल्यापासून नागरिकांनी आयुक्तांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, आयुक्त भेटत नव्हते. भेटीसाठी देण्यात येणारी चिठ्ठी स्वीकारणेही बंद करण्यात आले. पाचच्या सुमारास आयुक्त डॉ. सूर्यवंशी हे तिसऱ्या मजल्यावर पालखी सोहळा नियोजनाच्या बैठकीला जाण्यासाठी दालनातून बाहेर पडताच नागरिकांनी त्यांना घेराव घातला. पालखीची बैठक असल्याचे सांगून आयुक्त सुरक्षारक्षकांच्या गराड्यात बाहेर पडले. दरम्यान, सत्ताधारी भाजपचे दोन नगरसेवकही आयुक्तांना भेटण्यासाठी प्रतीक्षा कक्षात बसले होते. त्यांनाही आयुक्त भेटले नाहीत. आयुक्तांच्या भेटीविना दोन्ही नगरसेवक निघून गेले. दरम्यान, या बाबत आयुक्तांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
संतप्त नागरिकांकडून साखळदंड काढण्याची मागणी
आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारावर साखळदंड लावण्यात आला आहे. अनेक वेळा थांबूनही आयुक्त भेटत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी सुरक्षा रक्षकांकडे साखळदंड काढण्याची मागणी केली. सुरक्षारक्षकाबरोबर नागरिकांची हुज्जत झाली.
आयुक्त नेमके कोणासाठी?
नागरिकांना भेटण्यासाठी अगोदर तीन दिवस होते. आता दोनच दिवस आणि दोनच तास राखीव ठेवले आहेत. वेळेत कपात कशासाठी केली आहे? नागरिकांना भेटीसाठी राखीव असलेल्या दिवशी बैठका ठेऊ नये असा आदेश असतानाही बैठका कशाला ठेवल्या जात आहेत? आमची छोटी कामे असतात, खालचे अधिकारी दाद देत नाहीत. त्यामुळे आम्हाला आयुक्तांकडे यावे लागते, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. सायंकाळी सव्वा सहा वाजता बैठक संपल्यानंतर आयुक्त दालनात आले. बैठक संपेपर्यंत थांबलेल्या काही नागरिकांना आयुक्त भेटले.
भेटण्यासाठी राखीव असलेल्या दिवशी आयुक्तांनी बैठक ठेवली. आयुक्त नागरिकांना भेटत नाहीत. त्यांच्या भेटीसाठी प्रतीक्षेत थांबावे लागते. आयुक्तांचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया नागरिक प्रदीप गायकवाड यांनी दिली.
