पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध कामांसंदर्भात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी नागरिकांकरिता ठेवण्यात आलेल्या वेळेमध्ये प्रशासनाने बदल केला आहे. आता आठवड्यातील मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.
पावणेचार वर्षांची प्रशासकीय राजवट संपून फेब्रुवारीपासून महापालिका सभागृह अस्तित्वात आले. प्रशासकीय राजवटीमध्ये तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ सोमवार, बुधवार व शुक्रवार दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशी निश्चित केली हाेती. आता महापालिकेत लाेकप्रतिनिधी निवडून आल्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निवारण व पारदर्शक प्रशासकीय कामकाज साध्य होत असल्याचा दावा आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी केला. त्यामुळे नागरिकांना अधिकाऱ्यांना विविध कामांसंदर्भात आठवड्यातील केवळ मंगळवार आणि गुरुवार या दाेन दिवसांत दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत भेटता येणार आहे.
भेटीबाबत आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना
- भेटीच्या वेळेत विभागांतर्गत बैठकांचे, दौऱ्याचे आयोजन करू नयेत.
- भेटीचा कालावधी सूचना फलकावर ठळकपणे लावावा.
- प्रत्येक अभ्यागताचे म्हणणे पुरेसा वेळ देऊन ऐकून घ्यावे.
- अभिप्राय प्रणाली तयार करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाले की नाही, याची खात्री करावी.
- अपरिहार्य कारणांमुळे विभागप्रमुखांना कार्यालयात उपस्थित रहाणे शक्य नसल्यास पर्यायी व्यवस्था करावी.
विभागप्रमुख, अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेचे पालन करावे. काटेकोर नियमितपणा व वक्तशीरपणा राखवा. वेळेत कार्यालयात उपस्थित राहावे. कार्यालयीन वेळेनंतरच कार्यालय सोडावे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
