पिंपरी : ‘कामकाज शिस्तबद्ध होण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेत उपस्थित राहावे. कार्यालयीन शिस्त पाळावी. विभागात स्वच्छता असावी आणि पारदर्शक कामकाजावर भर द्यावा,’ अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी बुधवारी मुख्य प्रशासकीय भवनातील विविध विभागांना भेट देत कामकाजाची पाहणी केली. सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता सुनील भागवानी, बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, उपायुक्त राजेश आगळे, सचिन पवार, चेतना केरुरे या वेळी उपस्थित होत्या. आयुक्तांनी सकाळी पावणेदहा वाजता पाहणीला सुरुवात केली; त्या वेळी अनेक विभागप्रमुख दालनात उपस्थित नव्हते. त्यावरून आयुक्तांनी अधिकाऱ्यांना वेळेत उपस्थित राहण्याची तंबी दिली.
विभागातील दैनंदिन कामकाज, प्रलंबित विषय, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी व त्यावर करण्यात येणारी कार्यवाही या बाबत माहिती घेतली. अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून कामातील अडचणी, आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा यांचा आढावा घेतला. प्रशासनातील कामकाज अधिक सुटसुटीत आणि गतिमान करण्यासाठी विभागीय पातळीवर समन्वय वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
कागदविरहित कामकाजावर भर
विभागांची अंतर्गत रचना, बैठकव्यवस्था आणि कार्यालयीन परिसराची स्वच्छता यावर विशेष भर द्यावा. कार्यालयीन जागा अधिक सुव्यवस्थित, स्वच्छ आणि कामकाजास पूरक राहील, यासाठी जुन्या नस्ती व अनावश्यक कागदपत्रांचे गठ्ठे तत्काळ हटविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक वापर करून कागदविरहित कामकाज वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.
पंधरा दिवसांनी पाहणी
कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्यपरिसर निर्माण करणे, तसेच नागरिकांना कार्यालयात येताना सुलभ आणि विश्वासार्ह सेवा अनुभव मिळावा. पुढील पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा सर्व विभागांची पाहणी करून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. सर्व प्रभाग कार्यालयांचीदेखील लवकरच पाहणी करणार असल्याचेही डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
