पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती अडचणीची आहे. अशा स्थितीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची कसोटी लागणार आहे. त्यासाठी एक एप्रिलपासून दिशा निश्चित केली जाणार आहे. पारदर्शक कामकाज करण्यात येणार असून, चुकीचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,’ असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्वसाधारण सभेत सांगितले.

अर्थसंकल्पावरील चर्चेनंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रशासनाची बाजू नगरसेवकांसमोर मांडली. नगरसेवकांनी जबाबदारीची जाणीव करून दिली असून, शहर विकासाच्या कामाची अपेक्षा केली. ती पूर्ण करण्याची ग्वाहीही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी दिली.

‘सर्व नगरसेवकांच्या भाषणांतून शहरातील प्रश्न मला समजले आहेत. त्यामुळे काम करण्यासाठी, प्रश्न सोडविण्यासाठी एक दिशा मिळाली आहे. नगरसेवकांनी मांडलेले सर्व मुद्दे समजून घेऊन एक एप्रिलपासून दिशा ठरवणार आहे. तत्पर आणि पारदर्शक कामकाज केले जाणार आहे. चुकीची कामे करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी काम करण्यात येईल,’ असे ते म्हणाले.

‘फेरीवाला क्षेत्र, सशुल्क वाहनतळ धोरण, जाहिरात फलकाचे सुधारित दर लागू करण्यात येणार आहेत. विविध माध्यमांतून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर भर राहणार आहे,’ असेही आयुक्त सूर्यवंशी म्हणाले.