पिंपरी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील अतिधोकादायक इमारतींमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी संबंधित मिळकतधारकांना तत्काळ नोटीस बजाविण्यात यावी, या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना द्याव्यात, तसेच आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. अतिक्रमणांवरील कारवाईला वेग देण्याची सूचनाही त्यांनी केली.

शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे, फेरीवाला व्यवस्थापन, बांधकाम परवानगी, पाणीपुरवठा, तसेच विविध विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा आयुक्तांनी आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह शहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सुनील भागवानी या वेळी उपस्थित होते. शहरातील पदपथांवरील अतिक्रमण तातडीने हटवून पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा. फेरीवाला व्यवस्थापनाबाबत नियमानुसार कारवाई करावी. अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई, बांधकाम परवानग्यांची नियमित पडताळणी, पाणीपुरवठा व्यवस्थेचे प्रभावी नियोजन, तसेच विविध विकास प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या.

परवानग्या देण्याबाबत नियमानुसार कार्यवाही

कोणत्याही परिस्थितीमध्ये नाल्यांचा मूळ प्रवाह बाधित होणार नाही. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साचण्याच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्याबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्याच वेळी कार्यवाही करावी. बांधकाम परवानगी, अग्निशामक परवानगी अशा विविध परवानग्या देण्याबाबतदेखील प्रशासकीय यंत्रणांनी नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केल्या.

नागरिकांना कचरा वर्गीकरण मोहिमेमध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल. ओला व सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश नागरिकांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.