पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे शहर तुंबल्यानंतर महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ३५० ठिकाणी नाल्यांवर अतिक्रमण, तर काही ठिकाणी नाले अरुंद केल्याचे वा बुजविल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या नाल्यांवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. पाण्याचा निचरा न झाल्याने शहर तुंबले. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नाल्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये शहरातील कित्येक किलोमीटर नाले बुजविले, वळविले, अरुंद केल्याची ३५० ठिकाणे निदर्शनास आली. त्यामुळे पाणी वाहून गेले नसल्याचे स्पष्ट झाले.

अशा ठिकाणांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचा आदेश आयुक्तांनी दिला.

नाल्यांवर इमारतीचे बांधकाम?

गावांचे रूपांतर उपनगरांत आणि उपनगरांचे रूपांतर आता स्मार्ट सिटीत झाले आहे. पवना, मुळा आणि इंद्रायणी या तीन नद्यांच्या तीरांवर पिंपरी-चिंचवड शहर वसले आहे. त्यामुळे उपनगरातील पाणी नद्यांकडे वाहून जाते. नैसर्गिक प्रवाह निर्माण होऊन नाले तयार झाले. मात्र, शहरीकरणामध्ये अनेक नाले गायब झाले आहेत. अनेक नाल्यांवर इमारतीचे बांधकाम झाल्याची शंका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पावसाळ्यामध्ये नाले तुंबण्याचे प्रकार घडतात. कारणांचा शोध घेतला असता, सुमारे ३५० ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहावर विविध कारणांनी परिणाम झाल्याचे आढळले. अशा ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात नाल्यांमुळे पाणी तुंबणार नाही, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शहराचा विभागनिहाय आराखडा

पिंपरी-चिंचवड शहरात उद्भवणाऱ्या पूरस्थितीसह कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी शहराच्या भौगोलिक रचनेचा, नैसर्गिक नाल्यांचा, पर्जन्यमानाचा तसेच वातावरणीय बदलांचा सखोल अभ्यास करून विभागनिहाय सर्वंकष आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे.