जकात रद्द झाल्यानंतरही पालिकेला वर्षांत १३९० कोटींचे उत्पन्न

पिंपरी पालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाने आर्थिक वर्षांत १३९० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. जकात रद्द झाल्यानंतरही एलबीटीच्या माध्यमातून पिंपरी पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाचा आलेख सतत चढता राहिला आहे. तीन महिन्यांनंतर एलबीटी पूर्णपणे रद्द होऊन वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू होणार आहे. या नव्या करप्रणालीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जकातीच्या भरघोस उत्पन्नावर पिंपरी पालिकेची श्रीमंती अवलंबून होती, मात्र जकात रद्द झाली आणि एक एप्रिल २०१३ पासून एलबीटी लागू करण्यात आली. जकातीच्या माध्यमातून शेवटच्या वर्षांत जमा झालेले उत्पन्न १०९४ कोटी रुपये होते. एलबीटी लागू झाल्यानंतर २०१३-१४ या पहिल्याच वर्षी ८८८ कोटी रुपये पालिकेला मिळाले होते. जवळपास २०० कोटी रुपयांची तूट तेव्हा दिसून आली होती. मात्र, हळूहळू परिस्थिती बदलत गेली. २०१४-१५ या वर्षांत १०२१ कोटी रुपये, २०१५-१६ या वर्षांत १३०८ कोटी रुपये उत्पन्न पालिकेला एलबीटीच्या माध्यमातून मिळाले. अशाच पद्धतीने चढता आलेख कायम ठेवून २०१६-१७ या वर्षांत १३९० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्यात पालिकेचा एलबीटी विभागात यशस्वी ठरला आहे.

आर्थिक वर्षांतील या उत्पन्नाचे वर्गीकरण केल्यास एलबीटीच्या माध्यमातून ५७४ कोटी, मुद्रांक शुल्क १०१ कोटी, राज्य शासनाचे सहायक अनुदान ७१३ कोटी पिंपरी पालिकेचा प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले. अशोक मुंढे यांनी चार वर्षे हा विभाग कुशलतेने सांभाळला. त्यांच्यानंतर यशवंत माने यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती.

माने यांच्या बदलीनंतर महेश डोईफोडे यांच्याकडे एलबीटी विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

२०१६-१७ मधील एलबीटीचे उत्पन्न (रुपयांत)

एप्रिल  – १२१ कोटी ३७ लाख

मे      – ११५ कोटी ४७ लाख

जून    – ११२ कोटी ६३ लाख

जुलै   – ११७ कोटी ६९ लाख

ऑगस्ट – ११९ कोटी ०७ लाख

सप्टेंबर – ११९ कोटी ६७ लाख

ऑक्टोबर – १२६ कोटी २९ लाख

नोव्हेंबर – १२१ कोटी ३६ लाख

डिसेंबर – ११६ कोटी ६६ लाख

जानेवारी – ८२ कोटी ७७ लाख

फेब्रुवारी – ११२ कोटी ४५ लाख

मार्च – ११४ कोटी ७६ लाख

एकूण – १३९० कोटी १९ लाख