पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या वाढत्या वर्चस्वात अपक्ष उमेदवारांचा प्रभाव यंदा कमालीचा घटलेला दिसून आला. प्रभाग क्रमांक २४ मधून निवडून आलेल्या शालिनी गुजर या भाजप पुरस्कृत एकच विजयी होणाऱ्या तांत्रिकदृष्ट्या अपक्ष उमेदवार ठरल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतील अपक्ष नगरसेवकांचा आलेख घसरल्याचे दिसून येत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची २०१७ आणि २०२६ या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. ३२ प्रभागातून १२८ नगरसेवक निवडून आले आहेत. एका प्रभागाची कमीत कमी ३३ हजार ते जास्तीत-जास्त ७५ हजार एवढी मतदार संख्या हाेती. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षाकडून उमेदवारी घेण्यास अनेकांनी प्राधान्य दिले. मात्र, राजकीय पक्षांकडून उमेदवारी न मिळालेले यंदा १६५ उमेदवार रिंगणात हाेते. यापैकी फक्त एका उमेदवाराचा विजय झाला असून अनेकांची अनामत रक्कम (डिपाॅझिट) देखील वाचले नाही. २०१७ च्या निवडणुकीत २४७ अपक्ष उमेदवार निवडणुकीला सामाेरे गेले हाेते. त्यापैकी पाच जण निवडून आले हाेते.

१६५ अपक्षांना १ लाख २३ हजार ८६९ मते

प्रभाग १ व २१ मधून २, प्रभाग २ मधून ३, प्रभाग ३, १४, २५ मधून ५, प्रभाग ४, २०, २९ मधून ४, प्रभाग ५, १२, १७,१८, २७, २८ मधून १, प्रभाग ८, ९, १०, १६, ३१ मधून ८, प्रभाग ११ व ३० मधून १५, प्रभाग १३ व ३२ मधून १०, प्रभाग १९ मधून १२, प्रभाग २२ व २४ मधून ७, प्रभाग २५ मधून ६ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. प्रभाग ६, ७, १५ मध्ये एकही अपक्ष नव्हता. अपक्षांना एकूण १ लाख २३ हजार ८६९ मते मिळाली आहेत.

अशी झाली घसरण

सुरुवातीच्या काळात राजकीय पक्षांची पकड आजच्या तुलनेत कमी होती. त्यामुळे स्थानिक नेते अपक्ष म्हणून मोठ्या संख्येने निवडून येत असत. १९८६ मध्ये ६० उमेदवारांपैकी १४, १९९२ मध्ये सर्वाधिक १७ अपक्ष निवडून आले होते. १९९७ मध्ये ७८ पैकी १४, २००२ मध्ये १०५ पैकी १३, २००७ मध्ये १०५ पैकी ११ अपक्ष निवडून आले होते. २०१२ मध्ये शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेसची मोठी लाट असतानाही १४ अपक्ष निवडून आले होते. काळानुरूप चित्र बदलत गेले. २०१७ मध्ये प्रथमच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू झाली. मोठ्या प्रभागरचनेमुळे अपक्षांना पूर्ण प्रभागात प्रचार करणे कठीण झाले. परिणामी, २०१७ मध्ये ही संख्या निम्म्याहून कमी होऊन केवळ पाचवर आली. यंदा बहुतांश प्रभागांमध्ये दुरंगी किवा तिरंगी लढती झाल्या. मतदारांनी थेट पक्षाला कौल देणे पसंत केले. त्यामुळे ही संख्या एकावर आली. मागील निवडणुकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी संख्याबळ कमी पडल्यास अपक्षांनी किंगमेकरची भूमिका बजावली आहे. मात्र यंदा एक तांत्रिकदृष्ट्या अपक्ष सभागृहात जाणार आहे.

यंदा लक्षणीय मते मिळवणारे अपक्ष

करिश्मा बारणे – ११ हजार १४०, राजेंद्र गावडे – १० हजार २२८, शालिनी गुजर – २ हजार ९ हजार १५, गणेश गुजर – सात हजार ७८, रूपाली गुजर – ६ हजार २८१, सागर परदेशी – ६ हजार १२६, पायल पसरणीकर – ५ हजार ८५, कविता मोरे – ३ हजार २४२, विकास तामचीकर – २ हजार ९८९, प्रतिभा ताम्हणकर – २ हजार ५१५ मते मिळाली आहेत.