पिंपरी : स्थानिकांचा विरोध डावलून पारंपरिक राजकीय विरोधक राहुल कलाटे यांचा भाजपमधील प्रवेश, भाजपच्या माजी महापौरांना पक्षाच्याच माजी नगरसेविकेने दिलेले आव्हान, पक्षात झालेली बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले प्रबळ उमेदवार या सर्वांवर मात करून विधानसभा निवडणुकीत कायम पाठीशी राहणाऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सात प्रभागांमध्ये वर्चस्व राखण्याचे आव्हान आमदार शंकर जगताप यांच्यासमोर आहे. आयाराम उमेदवार, भाजप, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी रिंगणात असल्याने येथील लढती लक्षवेधी आहेत.

चिंचवडमध्ये १३ प्रभाग असून सर्वाधिक ५२ नगरसेवक निवडून जातात. मागीलवेळी भाजपचे ३३ नगरसेवक निवडून आले होते. प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, प्रभाग २७ तापकीरनगर, रहाटणी, प्रभाग २९ पिंपळे गुरव आणि प्रभाग ३२ सांगवी या चार प्रभागांतून भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले होते. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, पिंपळे निलख हा परिसर जगताप कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो.

सन २००९ पासून विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत जगताप कुटुंबातील सदस्याला या परिसरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर महापालिकेची पहिलीच निवडणूक होत असल्याने बालेकिल्ल्यावर वर्चस्व राखण्याचे आव्हान भाजपचे निवडणूक प्रमुख, आमदार शंकर जगताप यांच्यासमोर आहे.

जगताप कुटुंबातील सदस्यांविरोधात चारवेळा विधानसभा निवडणूक लढविलेले पारंपरिक राजकीय विरोधक राहुल कलाटे हे आता भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे जगताप-कलाटे यांच्यातील राजकीय वाद संपुष्टात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या माजी महापौर शकुंतला धराडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून आलेले कलाटे, नवनाथ जगताप हे कमळाच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे येथील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप शहराध्यक्षांना प्रदेशाध्यक्षांची तंबी

भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे प्रभाग २८ मधून निवडणूक रिंगणात आहेत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाचे पॅनल आहे. दरवेळी दोन्ही काटे समोरासमोर न येता निवडून येतात. यावेळीही दोघांनी समोरासमोर येण्याचे टाळले. त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हातमिळवणी न करता पॅनल निवडून आणण्याची तंबी शत्रुघ्न काटे यांना दिली आहे. त्यामुळे पॅनेलमधील चारही उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान शत्रुघ्न काटे यांच्यासमोर असणार आहे.

पहिल्यांदाच कलाटे बंधू समोरासमोर

प्रभाग २५ मध्ये भाजपकडून राहुल कलाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मयूर कलाटे निवडणूक रिंगणात आहेत. दोघेही समोरासमोर न येता निवडून येत असत. यावेळी पहिल्यांदाच कलाटे बंधू समोरासमोर निवडणूक लढत असल्याने येथील लढतीकडे लक्ष लागले आहे. शितोळे विरुद्ध शितोळे लढत शेवटचा प्रभाग असलेल्या सांगवीमध्ये भाजपकडून प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतुल शितोळे मैदानात उतरले आहेत. दोघांनीही स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. प्रशांत शितोळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही शितोळे समारोसमोर निवडणूक लढवत आहेत.

शहराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे प्रभाग २६ मधून निवडणूक लढवत आहेत. एकमेव या प्रभागात त्यांच्या पक्षाचे चारही उमेदवार आहेत. त्यामुळे स्वत:सह पॅनेलमधील उमेदवार निवडून आणण्याचे आव्हान कामठे यांच्यासमोर असणार आहे.

माजी महापौरांना माजी नगरसेविकेचे आव्हान

भाजपच्या माजी महापौर उषा ढोरे या प्रभाग ३० मधून पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. येथे भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. ढोरे यांना भाजपच्याच माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांनी आव्हान दिले आहे. सोनवणे यांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. त्यामुळे ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

प्रभाग २५ वाकड-पुनावळे
अ: कुणाल वाव्हळकर (भाजप), विक्रम वाघमारे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब: रेश्मा भुजबळ (भाजप), रेखा दर्शिले (राष्ट्रवादी काँग्रेस)
क : श्रुती वाकडकर (भाजप), चित्रा पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : राहुल कलाटे (भाजप), मयूर कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग २६ पिंपळे निलख-कस्पटे वस्ती
अ : विनायक गायकवाड (भाजप), संकेत जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
ब : आरती चोंधे (भाजप), सारिका कस्पटे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
क: स्नेहा कलाटे (भाजप), सीमा काठे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)
ड: संदीप कस्पटे (भाजप), तुषार कामठे (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार)

प्रभाग २७ काळेवाडी-रहाटणीगाव
अ: बाबा त्रिभुवन (भाजप), सुमित डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस), भैया गायकवाड (शिवसेना)
ब: सविता खुळे (भाजप), अश्विनी तापकीर (राष्ट्रवादी काँग्रेस)
क: अर्चना तापकीर (भाजप), अनिता थोपटे (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिता तांबे (शिवसेना), वनिता नखाते (शिवसेना-ठाकरे)
ड: चंद्रकांत नखाते (भाजप), सागर कोकणे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग २८ पिंपळे सौदागर-कुणाल आयकॉन
अ: शत्रुघ्न काटे (भाजप), उमेश काटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब: अनिता काटे (भाजप), शीतल काटे (राष्ट्रवादी काँग्रेस)
क: कुंदा भिसे (भाजप), मिनाक्षी काटे (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिता तुतारे (शिवसेना-ठाकरे)
ड: संदेश काटे (भाजप), विठ्ठल काटे (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग २९ पिंपळे गुरव-सुदर्शननगर
अ: रविना आंगोळकर (भाजप), कुंदा डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस)
ब: शकुंतला धराडे (भाजप), सुनीता कोळप (राष्ट्रवादी काँग्रेस)
क: शशिकांत कदम (भाजप), राजू लोखंडे (राष्ट्रवादी काँग्रेस)
ड : श्याम जगताप (भाजप), तानाजी जवळकर (राष्ट्रवादी काँग्रेस)

प्रभाग ३१ सांगवी-विनायकनगर
अ : दुर्गाकौर आदियाल (भाजप), दीप्ती कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), मनीषा खुडे (शिवसेना)
ब : ज्ञानेश्वर जगताप (भाजप), राजेंद्र जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रशांत कडलग (शिवसेना)
क: पल्ल्वी जगताप (भाजप), उमा पाडुळे (राष्ट्रवादी काँग्रेस), आरती भेगडे (शिवसेना)
ड: नवनाथ जगताप (भाजप), अरुण पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), मेघराज लोखंडे (शिवसेना)

प्रभाग ३२ सांगवी गावठाण
अ: तृप्ती कांबळे (भाजप), निशा कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), सारिका भांडलकर (शिवसेना), ज्योती गायकवाड (शिवसेना-ठाकरे)
ब: हर्षल ढोरे (भाजप), प्रसाद शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस), निमिला भागवत (शिवसेना), रेश्मा शिंदे (शिवसेना-ठाकरे)
क: उषा ढोरे (भाजप), उज्ज्वला ढोरे (राष्ट्रवादी काँग्रेस), शारदा सोनवणे (अपक्ष)
ड: प्रशांत शितोळे (भाजप), अतुल शितोळे (राष्ट्रवादी काँग्रेस), सुमित भोसले (शिवसेना-ठाकरे)