गेल्या १५ वर्षांपासून पिंपरी पालिकेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची पर्यायाने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निर्विवाद सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. अजित पवारांच्या बगलबच्च्यांनी पिंपरी पालिकेची अक्षरश: ‘खाऊगल्ली’ केली होती. त्यांच्या भ्रष्ट कारभाराचाच फटका राष्ट्रवादीला बसला आहे. मतदारांनी बारामतीचा ‘कारभारी’ बदलून शहरातील भूमिपुत्रांच्या हातात सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

पिंपरी पालिकेत २००२ पासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला निर्विवाद बहुमत मिळाले. ‘अजित ‘दादा’ बोले आणि पिंपरी-चिंचवड डोले’ अशी येथील परिस्थिती होती. ‘पुन्हा राष्ट्रवादी’ अशी साद देत यंदा ‘हॅट्ट्रिक’ करण्याचे अजित पवारांचे मनसुबे होते. मात्र, ते पुरते धुळीस मिळाले आहेत. राष्ट्रवादीने शहर विकासाच्या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित केले. दहा वर्षांत शहराचा कायापालट झाल्याचे सांगत आणखी विकासासाठी पुन्हा सत्ता देण्याची साद त्यांनी मतदारांना घातली. भाजपने मात्र सुरुवातीपासून विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याची पोलखोल करत राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारावर सातत्याने हल्लाबोल केला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या व अजित पवारांचेच एके काळी अनुयायी असलेल्या लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी ‘गुरूची विद्या गुरूला’ दिली. त्यांनी राष्ट्रवादीला नियोजनबद्धपणे खिंडार पाडले. खंदे कार्यकर्ते आणून भाजपची ताकद वाढवली. राष्ट्रवादीतून आलेलेच आजी-माजी नगरसेवक या वेळी भाजपचे उमेदवार होते. निवडणूक काळात नेहमी ज्या पद्धतीने पवारांकडून डावपेच खेळले जात होते, त्याही पुढे दोन पावले जात जगताप-लांडगे जोडीने व्यूहरचना केली. साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर खुबीने केला. आर्थिक सक्षमता आणि निवडून येण्याची क्षमता हाच उमेदवारीचा मुख्य निकष ठेवण्यात आला होता. त्यावरून पक्षात बरेच रणकंदन झाले. नव्या आणि जुन्यांचा वाद झाला, त्यातून पाडापाडीचे राजकारणही झाले. मात्र, सर्व प्रतिकूल गोष्टींच्याही पलीकडे जाऊन शहरातील जनतेने भाजपच्या पारडय़ात घसघशीत माप टाकले आहे. ‘नको भानामती, नको बारामती’ या प्रचारातील मुद्दय़ाला मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्थानिक नेत्यांच्या हातात कारभार दिला आहे.