राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार करून विकासाचे राजकारण करण्यासाठी पुणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखविला आहे. तो आम्ही सार्थकी लावू. भाजपचा महाविजय हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आहे. पुणेकरांनी विकासाला कौल दिला आहे, अशा शब्दात पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विजयानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रात, राज्यात आणि आता महापालिकेत सर्वत्र जनाधार मिळाल्याने सर्वाना बरोबर घेऊन आम्ही पुण्याचा सर्वागीण विकास करू, अशी ग्वाही बापट यांनी दिली. ते म्हणाले, पुणेकरांनी आम्हाला राज्यात आणि केंद्रात मंत्रिपदे दिली. आमदार, खासदारपदही दिले. परंतु, पुण्याचे महापौरपद दिले नव्हते. ते यावेळी देऊ केले आहे. त्याबद्दल पुणेकरांचे आभार. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असल्याने मेट्रोसह विकास आराखडय़ाची अंमलबजावणी, २४ तास पाणी, नदी सुधारणा, कचरामुक्त पुणे, रिंगरोडची पूर्तता, स्मार्ट पुणे यासारख्या अनेक योजना मार्गी लावणे सोपे झाले आहे.

मतदारांना सामोरे जाताना आम्ही सतत विकासाच्या मुद्दय़ांवर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रगतीचा आलेख त्यांच्यासमोर मांडला. परंतु, विरोधकांनी सातत्याने नकारात्मक मुद्दे प्रचारात आणले. आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. गुंडाची पार्टी म्हणून आमची अवहेलना केली. सभा फ्लॉप झाल्याचा कांगावा आणि जाहीरनामा चोरल्याचा आरोप झाला. सिंहगडावर झालेल्या शपथविधीवर हल्लाबोल केला. अनवधानाने केलेल्या विधानाबाबतची व्हीडीओ क्लिप ‘व्हायरल’ केली. समंजस पुणेकरांनी या टीकेला मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. ‘कारभारी बदला पुणे बदलेल’ या आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे, असेही बापट यांनी सांगितले.