पिंपरी : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बंद ठेवणाऱ्या रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड या भागातील आठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा नळजोड खंडित करण्यात आले. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने शुक्रवारी या सोसायट्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ४९४ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांपैकी ३९५ सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) कार्यान्वित आहेत. वारंवार आवाहन करूनही ९९ साेसायट्यांमधील ‘एसटीपी’ विविध कारणांनी बंदच आहेत. यांपैकी ६२ साेसायट्यांना पहिली, दुसरी आणि तिसरी नाेटीस दिली आहे. ‘एसटीपी’ प्रकल्प सुरू करण्यासाठी दिलेली मुदत संपल्याने या ६२ साेसायट्यांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई हाती घेतली आहे.

साेसायट्यांचे नळजोड खंडित करण्यासाठी दाेन मजूर आणि दाेन प्लंबर अशा चार कर्मचाऱ्यांच्या दाेन स्वतंत्र पथकांची स्थापना केली आहे. या पथकाच्या मदतीने पर्यावरण विभागाने कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार शुक्रवारी रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, वाकड भागातील आठ मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील नळजोड खंडित करण्यात आले आहेत. ही कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचे पर्यावरण विभागाने सांगितले.

सोसायट्यांमधील ‘एसटीपी’ बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा वापर जास्त होत आहे. सांडपाण्याचा फेरवापर होत नाही. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे ‘एसटीपी’ बंद असलेल्या सोसायट्यांवर कारवाई सुरू केली आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात ३७ सोसायट्यांवर कारवाई

उर्वरित ३७ साेसायट्यांचा तिसऱ्या नाेटीसचा कालावधी संपला नाही. त्यामुळे या सोसायट्यांवर दुसऱ्या टप्प्यात कारवाई केली जाणार आहे. कारवाईसाठी पाणी पुरवठा विभागाने दाेन पथकांची स्थापना केली असून प्रत्यक्षात कारवाईला सुरूवात केली आहे.