पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक विद्युत वाहने (ईव्ही) खरेदीला पसंती देत असतानाच सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याच्या महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याने चार वेळा निविदा रद्द करावी लागली आहे. आता अटी-शर्ती बदलून पुन्हा नव्याने निविदा प्रसिद्ध केली जाणार असल्याचे विद्युत विभागाने सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये २४ लाखांहून अधिक नोंदणीकृत वाहने आहेत. त्यामध्ये दीड लाखांच्या आसपास विद्युत वाहनांचा समावेश आहे. या वाहनांसाठी शहरात स्वत: बांधा आणि संचालित करा या तत्त्वावर स्थानके उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाचे २०२२ पासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चार वर्षांपासून महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे यापूर्वी अटी-शर्ती बदलत तीन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या. गतवर्षी एका खासगी संस्थेला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली हाेती. मात्र, ऐनवेळी संबंधित संस्थेने चार्जिंग स्थानके उभारण्यास नकार दिला. पुन्हा एकदा निविदा काढली. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता ही जुनी निविदा रद्द करण्यात आली असून अटी-शर्तीमध्ये बदल करून नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
शहरात केवळ १७ चार्जिंग स्थानके
सद्य:स्थितीत शहरात दीड लाखांच्या आसपास ईव्ही वाहने आहेत. काही चालक घरीच चार्जिंग करतात. मात्र, कामानिमित्त बाहेर आल्यास आणि चार्जिंग संपल्यास अशा वाहनांच्या चार्जिंगचा प्रश्न निर्माण हाेत आहे. शहरात सद्य:स्थितीत पेट्राेल पंपासह इतर ठिकाणी केवळ १७ खासगी चार्जिंग स्थानके आहेत.
२१ ठिकाणी चार्जिंग स्थानके प्रस्तावित
जुना पुणे-मुंबई महामार्ग, दुर्गादेवी टेकडी, वाहतूकनगरी (निगडी), बर्ड व्हॅली संभाजीनगर, बजाज ऑटो, कुस्ती संकुल भोसरी, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडिअम नेहरूनगर, चिखली, मलनिस्सारण केंद्र चिखली, संतनगर उद्यान कासारवाडी, कोकणे चौक, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, लांडेवाडी भोसरी, भक्ती-शक्ती निगडी, संत तुकारामनगर मेट्रो स्थानक, पी. के. चौक, योगा पार्क- पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान-पिंपळे गुरव, वल्लभनगर, ऑटो क्लस्टर आणि राजर्षी शाहू उद्यान अशा २१ ठिकाणच्या जागा चार्जिंग स्थानकासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.
शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न आहे. मात्र, स्थानके उभारण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अटी-शर्तीमध्ये बदल करून नव्याने निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाचे सह शहर अभियंता अनिल भालसाकळे यांनी सांगितले.
