पिंपरी : खोट्या कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीररित्या ६५० जन्म प्रमाणपत्र दिल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे. चौकशीत खोटे आढळलेले जन्म प्रमाणपत्र रद्द केले जाणार असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या यांनी मंगळवारी महापालिकेत भेट दिली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वैद्यकीय विभागाबरोबर बैठक घेतली. बोगस जन्म प्रमाणपत्रांबाबत चर्चा केली. महापौर रवी लांडगे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यावेळी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, ‘महाराष्ट्रात सुधारित जन्म प्रमाणपत्राच्या नावाने अनेक महापालिकेत घोटाळा झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईतील प्रमाणपत्रांची पडताळणी केली. तिथे ८७ हजार खोटे जन्मप्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आले आहे. आता ११ महापालिकेतील प्रमाणपत्रांची माहिती काढणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने बेकायदेशीररित्या ६५० जन्म प्रमाणपत्र दिल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आयुक्तांनी ग्वाही दिली आहे. चौकशीत खोटे आढळलेले जन्म प्रमाणपत्र रद्द केले जाणार आहेत. घोटाळ्याबाजांवर कारवाई होणार आहे’. दरम्यान, मागील साडेतीन वर्षांपूर्वीची दुरुस्तीची प्रकरणे असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केला आहे. महापालिकेतील बोगस उपसूना प्रकरणांसह विविध वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करण्यास सोमय्या यांनी नकार दिला.

मुंबईतील बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी

मुंबईत ८७ हजार खोटे जन्मप्रमाणपत्र दिल्याचे निदर्शनास आले आहे. आत्तापर्यंतच्या चौकशीत १९ हजार ८६० बनावट प्रमाणपत्र आढळली आहेत. कोणतेही कागदपत्रे नसताना हे प्रमाणपत्र दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. ज्यांच्या नावाने प्रमाणपत्र आढळले आहे अशा लोकांवर आणि बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांची पोलीस चौकशी होईल. त्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

रस्त्यावर नमाज पठणाला बंदी करा

मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीत एका कथित अनधिकृत दर्ग्यावर मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. हा दर्गा सरकारी जागेवर उभा करण्यात येत होता. याबाबत मी एप्रिल महिन्यात तक्रार दिली होती, असे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्रात अशा पद्धतीने दर्गा, मशिदीच्या नावाखाली अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. शुक्रवारी, काही विशेषदिवसी रस्त्यावर, रेल्वे स्थानकाच्या लगत नमाजपठण केले जाते. रस्त्यावरील नमाज तातडीने बंद करण्याचे आवाहन सोमय्या यांनी पोलीस आणि महापालिका आयुक्तांना केले आहे.