पिंपरी : शहरात कोठेही आग लागल्यास, पूरपरिस्थिती ओढवल्यास पूरनियंत्रण आणि बचावकार्य करणे, उद्वाहकामध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यापासून घरगुती स्वयंपाकाच्या सिलिंडरची गळती रोखणे, बुडत असलेल्यांना बाहेर काढणे यांसारख्या आपत्कालीन वर्दीसाठी सज्ज राहावे लागणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागासमोर अपुऱ्या मनुष्यबळाची ‘आपत्ती’ निर्माण झाली आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आपत्कालीन घटनांना सामाेरे जाताना अग्निशामक विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरात १८ अग्निशामक केंद्रांची गरज असून, सद्य:स्थितीत दहाच केंद्रे कार्यान्वित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने औद्योगिक कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन घटनांत सातत्याने वाढ हाेत आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात आगीच्या आणि इतर अशा दाेन हजार आपत्कालीन घटना घडल्या आहेत. अग्निशामक विभाग हा केवळ आग विझविण्यापर्यंत मर्यादित राहिला नसून, शासनाने २०२३ मध्ये त्याची व्याप्ती वाढविली आहे. ‘अग्निशामक’कडे आपत्कालीन सेवेचेही काम दिले आहे.

घटनास्थळी पोहोचण्यास विलंब

लाेकसंख्येच्या नियमाप्रमाणे शहरामध्ये १८ अग्निशामक केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत दहा केंद्रे सुरू आहेत. शहरी भागात एखादी घटना घडल्यानंतर पाच मिनिटांत अग्निशामक पथकाने पाेहोचणे अपेक्षित असते. महापालिकेचा अग्निशामक विभाग सात ते आठ मिनिटांमध्ये घटनास्थळी पाेहोचत आहे. विलंबासाठी वाहतूककाेंडीसह केंद्रांची कमी असलेली संख्या कारणीभूत ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२१४ जागा रिक्त

आकृतिबंधानुसार अग्निशामक विभागात चारही संवर्गांतील ४४५ जागा मंजूर आहेत. मात्र, सद्य:स्थितीत २३२ जागांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. मुख्य, उपमुख्य अग्निशामक अधिकारी प्रत्येकी एक, विभागीय अधिकारी दोन, सहायक विभागीय अधिकारी दोन, अग्निशामक केंद्र अधिकारी १२ अशा महत्वाच्या १८ जागा रिक्त आहेत. यासह उप अग्निशामक अधिकारी १८, यंत्रचालक ४८, लीडिंग फायरमन ११, फायरमन १०८, वाहनचालक ११ अशा २१४ जागा रिक्त असल्याचे अग्निशामक विभागाने सांगितले.

पुनावळे, प्राधिकरण, दिघीत नवीन केंद्र

येत्या वर्षभरात नव्याने पुनावळे, प्राधिकरण आणि दिघी ही तीन केंद्रे सुरू हाेतील. पिंपरीतील मध्यवर्ती अग्निशामक मुख्यालयाचे काम दाेन वर्षांत पूर्ण हाेईल. त्यानंतर १४ केंद्रे हाेतील. उर्वरित चार केंद्रांसाठी जागेचा शाेध सुरू असल्याचे अग्निशामक विभागाचे उपायुक्त व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले.

मतदारयादीची विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहीम संपल्यानंतर विविध विभागांतील पदांच्या रिक्त जागांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार भरती प्रक्रिया राबविली जाईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.