पिंपरी : पवना नदीला पूर आल्याने मोरया गोसावी मंदिर पाण्याखाली गेले आहे. फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली डिफेन्स कॉलनी येथील १०० कुटुंबे चिखली गावठाण येथील महापालिका शाळेत, केशवनगर येथील दहा कुटुंब महापालिका शाळेत स्थलांतरित करण्यात आली आहेत. किवळे येथे पूरस्थितीत अडकलेल्या गर्भवती महिलेची अग्निशमन विभागाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीत झालेली वाढ आणि नदीकाठच्या परिसरातील पूरस्थिती लक्षात घेता संभाव्य धोकादायक भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली आहे. आंबेडकर कॉलनी, भाटनागर आणि रिव्हर रोड परिसरातील नागरिकांना साबळे प्राथमिक शाळा तसेच महर्षि वाल्मिकी आश्रम येथे सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच फुगेवाडी आणि कासारवाडी येथील नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलविण्याची कार्यवाही सुरू आहे.

मोरया गोसावी मंदिर तसेच केशवनगर परिसरात स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा, भोजन आणि इतर मूलभूत सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुळानगर येथे महापालिकेचे विशेष आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले असून तेथील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय, पूरबाधित नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

पावसामुळे घरांमध्ये शिरलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा करण्यासाठी महापालिकेची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. गावडे कॉलनी परिसरात साचलेल्या पाण्याचा युद्धपातळीवर उपसा सुरू असून तानाजीनगर परिसरातही जलनिस्सारणाची कामे वेगाने सुरू आहेत. चिखली येथील डिफेन्स कॉलनी, साई शिव कॉर्नर परिसरात पाणी शिरल्याची माहिती मिळताच महापालिकेची यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आवश्यक उपाययोजना करत आहे.

आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जेसीबी, जलउपसा पंप तसेच आवश्यक यंत्रसामग्री तैनात करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना स्थानिक परिस्थितीनुसार तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी पावसाच्या पाण्याचा तात्काळ निचरा करण्याचे काम सुरू असून संबंधित विभागांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे झाडे पडण्याच्या घटनांवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी महापालिकेची सर्व पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी झाडे हटविणे, रस्ते मोकळे करणे आणि आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, नदीकाठच्या तसेच पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ महापालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पूरस्थितीत अडकलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप सुटका

सकाळी सात वाजता किवळे गावठाण येथील संभाजी महाराज चौक परिसरातील गंगोत्री निवास येथे आंचल मोहिते ही गर्भवती महिला पूरस्थितीत अडकल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागास प्राप्त झाली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व गर्भवती महिलेला सुरक्षितरीत्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. संपूर्ण बचावकार्य वेगाने आणि सुरक्षितपणे पार पाडण्यात आले.

नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे

संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या कामांशिवाय शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता तात्काळ आपत्कालीन संपर्क क्रमांकांवर संपर्क करावा. पूरप्रवण आणि नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना महापालिकेमार्फत केल्या जात असून स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असून महापालिका प्रशासन प्रत्येक घटनेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

शहरात सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा २४ तास कार्यरत असून प्रत्येक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या ठिकाणी तातडीने स्थलांतर, जलउपसा, बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालये, आपत्कालीन पथके आणि संबंधित विभागांना सतर्क राहून कोणत्याही घटनेला तात्काळ प्रतिसाद देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.