पिंपरी : मोशी बोऱ्हाडेवाडीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याबाबतच्या प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शुक्रवारी मान्यता दिली. महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेची १९९७ मध्ये हद्दवाढ झाली आहे. त्या वेळी बोऱ्हाडेवाडीचाही समावेश झाला. या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास योजनेत (डीपी) क्षेत्रासाठी नगररचना योजना तयार करण्याचे नियोजन आहे. हरकती व सूचनांसह त्याचा प्रस्ताव सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.

यापूर्वी २६ सप्टेंबर २०२४ च्या प्रशासकाच्या सर्वसाधारण सभेने प्रस्ताव मंजूर केला होता. त्याची नोंद राजपत्रातही झाली आहे. नागरिकांसाठी तो जाहीरही केला होता. मात्र, प्रत्यक्ष बाधित क्षेत्र व सातबारा उताऱ्यावरील क्षेत्रात विसंगती आढळली होती. त्यावर बाधित जमीन मालकांची बैठक घेऊन अनुषंगिक कामे पूर्ण करून योजनेचे प्रारूप नगररचना संचालकांकडून मान्य करून सरकारला सादर करणे शक्य झाले नाही. आता नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नगररचना योजना तयार करणे आवश्यक असल्याने सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी प्रशासनाने प्रस्ताव ठेवला होता. त्याला मान्यता मिळाली आहे.

‘स्मार्ट सिटी’वर संचालकांची नियुक्ती

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालक पदावर महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेचे (शिंदे) नगरसेवक नीलेश बारणे यांची पदसिद्ध संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.