पिंपरी : लाच मागितल्याप्रकरणी मुख्य अभियंत्यांना अटक झालेल्या घटनेचे तीव्र पडसाद पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत शुक्रवारी उमटले. आयुक्तांचे प्रशासनावर नियंत्रण राहिले नसून प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळे लाचखोरीच्या घटना वाढल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. अटक केलेले मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांना निलंबित नव्हे, तर बडतर्फ करण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. पाच मिनिटे सभेला बसून आयुक्त विजय सूर्यवंशी सभागृहातून बाहेर पडल्याने संतप्त नगरसेवकांनी उभे राहून भाषण केले. प्रशासनाचा निषेध करुन सभा २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

पिंपरी महापालिकेची ऑक्टोबर महिन्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी आयोजित केली होती. शिवसेनेचे (शिंदे) गटनेते विश्वजीत बारणे यांनी गुरुवारी घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणाकडे लक्ष वेधले. या घटनेमुळे पालिकेची देशपातळीवर बदनामी झाली.
पैसै घेतल्याशिवाय एकाही विभागातील नस्ती मंजूर होत नाही. नागरिक त्रस्त झाले असून नियंत्रण ठेवले नाही, तर उद्रेक होईल. आयुक्तांचे नियंत्रण, अंकुश राहिला नाही. आत्तापर्यंत ३६ अधिकाऱ्यांना लाचप्रकरणी अटक झाली असून महापालिकेत चाललयं काय? असा सवाल त्यांनी केला.

‘प्रशासकीय राजवटीत आलेली सूज, अहंकार आणि भ्रष्टाचाराने मिळविलेल्या संपत्तीची अधिकाऱ्यांनी मस्ती आहे. माझ्या पाठीमागे कोण आहे? या आविर्भावात अधिकारी आहेत. ओंभासे यांच्याबाबत प्रचंड तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या’, असे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले. जितेंद्र ननावरे म्हणाले, ‘आयुक्तांनी महापालिका मुख्यालय ऑटो क्लस्टरला हलविले असून ते नगरसेवक, नागरिकांना भेटत नाहीत. केवळ खासगी व्यक्तींनाच भेटतात. मुख्य अभियंता १९ हजारांची लाच घेताना पकडला जातो. किती वाईट परिस्थिती आहे. जगातील सर्वात भ्रष्टाचारी महापालिका अशी या आयुक्तांच्या काळात पालिकेची ओळख होईल’. ‘ओंभासे यांना निलंबित नव्हे बडतर्फ करण्याची मागणी’ अनंत कोऱ्हाळे यांनी केली.

‘कालच्या घटनेने शहराला काळिमा फासला आहे. अधिकाऱ्यांना केवळ निविदा काढण्यात रस असून जनतेचा आक्रोश झाल्यास त्यांना रस्त्यावर फिरणे कठीण होईल’, असा इशारा शीतल शिंदे यांनी दिला. ते बोलत असतानाच आयुक्त पाच मनिटांसाठी सभागृहात आले आणि निघून गेल्याने ‘नाटक बघायला आल्यासारखे आयुक्त आले आणि निघून गेल्याचे म्हणत त्यांनी आयुक्तांचा निषेध केला. ‘ओंभासे यांनी पालिकेची बदनामी केली. त्यांच्यावर यापूर्वीही निलंबनाची कारवाई झाली असताना त्यांना बढती कशी दिली’, असा सवाल कुणाल वाव्हळकर यांनी केला.

आयुक्तांच्या अनुउपस्थितीत चर्चेस नकार

लाच प्रकरण हे शहराच्या अस्मितेचा विषय आहे. आयुक्तांच्या अनुपस्थित चर्चा होणार नाही. सभा पाच मिनिटे तहकूब करावी. अधिकाऱ्यांमुळे शहराची बदनामी होत आहे. याबाबत आयुक्तांना कल्पना दिली होती. अधिकाऱ्यांकडून नागरिकांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी केला. सर्व नगरसेवक आक्रमक झाल्याने शितोळे यांनी २० नोव्हेंबरपर्यंत तहकुबीची सूचना मांडली. त्याला विरोधी पक्षनेते भोईर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर उमपहापौर शर्मिला बाबर यांनी सभा २० नोव्हेंबर दुपारी चार वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. दरम्यान, पंतप्रधान प्रगती योजनेची दृकश्राव्य संवाद पद्धतीने तातडीची ऑनलाइन बैठक असल्याने आयुक्त गेले होते, असे जनसंपर्क विभागाने कळविले.

नगरसेवकांचा रोष पाहताच अधिकारी सभागृहात

सभा कामकाज सुरू झाल्यानंतर केवळ वैद्यकीय विभागाचे तीन अधिकारी सभागृहात उपस्थित होते. नगरसेवकांचा रोष पाहताच अतिरिक्त आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना सभागृहात येण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर तत्काळ अधिकारी सभागृहात दाखल झाले.