पिंपरी : भाजपची नावे निश्चित हाेत नसल्याने स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा प्रस्ताव दुसऱ्यांदा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपवर ओढावली. भाजपची नावे अंतिम हाेत नसतील तर आमची तीन नावे जाहीर करा, अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी महापाैरांच्या आसनासमाेर धाव घेतली. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजपचे नगरसेवक सभागृहात आमने-सामने आले. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर रवी लांडगे हाेते. एप्रिल महिन्याची तहकूब सभा मंगळवारी पार पडली. या सभेच्या विषय पत्रिकेवर स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय हाेता. यावेळी भाजपच्या नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवक निवडीचा विषय वाचून त्याला अनुमाेदनही दिले. हीच तांत्रिक बाब लक्षात घेऊन विराेधी पक्षनेते भाऊसाहेब भाेईर यांनी विषयाला अनुमाेदन दिल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांच्या नावांची घाेषणा करण्याची मागणी महापाैर रवी लांडगे यांच्याकडे केली.
भाेईर म्हणाले, भाजपची नावे जेव्हा अंतिम हाेतील, तेव्हा त्यांची निवड जाहीर करा. राष्ट्रवादीची नावे आडवून ठेवू नका. आताच तीन नावांची घाेषणा करावी. कागदोपत्री प्रक्रिया करून प्रशासनाने हा प्रस्ताव आणला आहे. ज्येष्ठ नगरसेवक याेगेश बहल यांनीही भोईर यांच्या मागणीला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसची तीन नावे जाहीर करण्याची मागणी केली.
मात्र, महापाैरांनी लांडगे यांनी हा विषय तहकूब केल्याचे जाहीर करताच राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमाेर धाव घेत ‘दादागिरी चालणार नाही’, अशी घाेषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी भाजपच्या नगरसेवकांनीही महापाैरांच्या आसनासमाेर धाव घेतल्याने दाेन्ही पक्षाचे नगरसेवक आमने-सामने आले. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सभागृहात गाेंधळ वाढत असल्याचे लक्षात येताच महापाैरांनी १५ मिनिटांसाठी सभा तहकूब केली.
