पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड शहरातील खर्चिक आणि मोठे प्रकल्प बंद करावेत, लहान कामांसाठी निधी द्यावा, नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही, त्यामुळे नवीन बांधकाम प्रकल्पांना मान्यता देऊ नये, तसेच पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा या मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा झाली. महापौर रवि लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भाजपच्या विनोद नढे यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करत सव्वा तास भाषण केले. ‘प्रशासनाने अर्थसंकल्पाची वाताहत केली होती. स्थायी समितीने चांगली सुधारणा केली आहे. लोकाभिमुख अर्थसंकल्प सादर केला आहे. प्रशासकीय राजवटीत वाढीव दराच्या निविदा, थेट खरेदी करण्यात आली आहे. महापालिकेची लूट करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी. मोठ्या नस्ती खुल्या कराव्यात,’ अशी मागणी त्यांनी केली.
भाजपचे नितीन काळजे यांनी सल्लागार नियुक्त करणे बंद करण्याची मागणी केली. ‘मोठे प्रकल्प बंद करावेत, नवीन प्रकल्पाला मान्यता देऊ नये, मूलभूत समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे, लहान कामांना निधी द्यावा, मोठ्या बांधकाम प्रकल्पांना मंजुरी देऊ नये, बीआरटी प्रकल्प बंद करावा,’ अशी मागणी त्यांनी केली. ‘शहरातील दोन बोके भांडत असून, आर्थिक मलई खात आहेत. अनेक राजकारणीही ठेकेदार आहेत. ठेकेदार डोळ्यांसमोर ठेवून निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिका रुग्णालयात देयक कमी करण्यासाठी नगरसेवकांनी फोन केला, तर त्यांच्या खात्यावर पैसे टाकावेत,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे म्हणाले.
‘शहरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. अर्बन स्ट्रीट डिझाइनमुळे वाहनतळासाठी जागा राहिली नाही. त्यामुळे वाहतूककोंडी होते. सल्लागारांवर कोट्यवधी रुपये खर्च केला जात आहे. अधिकाऱ्यांची बुद्धी घास चरायला जाते का?’ असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमोद कुटे यांनी केला. ‘महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावेत,’ अशी मागणी शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी केली. श्रुती डोळस, बाबा त्रिभुवन, नीलेश नेवाळे, कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुलभा उबाळे, नीलेश बारणे, सोनाली गव्हाणे, अर्चना सस्ते, कुंदन गायकवाड, कविता भोंगाळे, उत्तम केंदळे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
महापालिका, नव्हे भाजपची सभा
अर्थसंकल्पावर भाजपच्याच दहा नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली. वारंवार हात वर करूनही पीठासनावर बसलेल्या उपमहापौर शर्मिला बाबर बोलण्यासाठी परवानगी देत नसल्याचा आरोप करून विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आसनासमोर धाव घेतली. महापालिका सभा नसून, ही तर भाजपची सभा असल्याचा आरोप केला. सभात्याग करण्याचा इशारा दिला. महापौरांनी समजूत काढल्यानंतर नगरसेवक सभागृहात थांबले. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भोंदूबाबा अशोक खरातला फाशीची शिक्षा द्या
महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी भोंदूबाबा अशोक खरात याचा सर्वसाधारण सभेत निषेध करण्यात आला. खरातला फाशीची शिक्षा करावी, अशी मागणी नगरसेविकांनी केला. खरातचा निषेध करून सर्वसाधारण सभा अर्धा तास तहकूब करण्यात आली होती.
