पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयास माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, थेरगाव येथील प्रस्ताविक कर्करोग रुग्णालयास दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभेत मान्यता दिली. तसेच रुग्णालय, विरुंगळा केंद्र, उद्यान, भाजी मंडई, सभागृह, चौक, रस्ते, पुल आदींचे नामकरण करण्यात आले आहे.
पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ (डॉयनासोर पार्क) उद्यानातील तसेच, बट्टूराव जगताप उद्यानातील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रास तसेच, येथील बस स्थानकास लोकनेते लक्ष्मण जगताप असे नाव देण्यात येणार आहे. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील ॲमेनिटी स्पेसला डॉ. केशव हेडगेवार उद्यान असे नाव देण्यात येणार आहे. बोऱ्हाडेवाडीतील स्प्रिंग गार्डन ते मंत्रा मुमेंट सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यास वासुदेव जाधव मार्ग असे नाव देण्यात येणार आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडेवाडीपासून रंजन वजन काटापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास डॉ. सुभाषचंद्र भोस यांचे नावे दिले जाणार आहे. बोऱ्हाडेवाडीतील सीएनजी पंपापासून लक्ष्मी चौकाच्या शिवरोडला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात येणार आहे. चऱ्होली येथे होणाऱ्या भाजी मंडईस सरपंच मल्हारराव दाभाडे सरकार असे नाव देण्यात येणार आहे.
भोसरी ते आळंदी रस्त्याचे वारकरी भक्ती मार्ग नामकरण
चिखलीमधील जुना मोई फाटा येथील चौकाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव, जाधववाडीतील उद्यानाला तळई गार्डन, मुख्य चौकाला सावता महाराज, शिवरोड ते मधला पेठेकडे जाणाऱ्या मुख्य चौकास जाधव कॉर्नर, शिवरोडवरील महाराज चौकास निवृत्ती जाधव मार्ग, वडाचा मळा चौकास वडाचा मळा, सिटी प्राईडजवळील चौकाला छत्रपती संभाजी महाराज आणि रिव्हर रेसिडन्सी सोसायटीजवळील चौकास श्रीराम चौक असे नाव देण्यात येणार आहे. भोसरी ते आळंदी रस्त्यास वारकरी भक्ती मार्ग असे नाव देण्यात आले आहे. भोसरी उड्डाणपुलाखालील दिघी रस्त्याजवळच्या चौकास भारतीय राज्यघटना चौक, तर दुसऱ्या चौकास छावा चौक असे नाव देण्यात आले आहे. स्पाईन रस्तालगत त्रिवेणीनगर चौकाच्या अलिकडील दुभाजक चौकास तिरंगा चौक असे नाव देण्यात आले आहे, या उपसूचनांना मान्यता देण्यात आली आहे.
तळवडेतील जैवविविधता पार्कला अजित पवारांचे नाव
महापालिकेच्या वतीने तळवडे येथे जैवविविधता पार्क (बायोडायव्हर्सिटी) प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. चिंचवड येथील विकास आराखड्यातील रस्त्यास माधवराव गावडे यांचे नाव देण्यात येणार आहे. चिंचवडगाव येथील पवना नदीवरील धनेश्वर मंदिराशेजारील फुलपाखरु (बटरफ्लाय) पुलास महासाधू मोरया गोसावी महाराज सेतू असे नाव देण्यात आले आहे.
दापोडी ते निगडी महामार्गास अण्णासाहेब मगर हमरस्ता नाव
शहरातील दापोडी ते निगडी या १२.५० किलोमीटर अंतराच्या जुन्या महामार्गास तसेच, प्रशस्त समतल विलगकास (ग्रेडसेपरेटर) अण्णासाहेब मगर हमरस्ता असे नाव देण्यात येणार आहे. पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डनला शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन असे नाव देण्यात आले आहे. या नामकरणाच्या उपसूचनांना मान्यता देण्यात आली आहे.
